राजापूर : राजापूर शहरवासींना मुबलक पाणीपुरवठा करता यावा व दरवर्षीची पाणीटंचाईची टांगती तलवार दूर व्हावी यासाठी शहराला नैसर्गिक रित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सुमारे १४८ वर्षे जुन्या ब्रीटीश कालीन सायबाच्या धरणाच्या खालील बाजुला नवीन पर्यायी धरणाचे काम गेली चार वर्षे सुरू आहे. मात्र प्रारंभी निधी अभावी रखडलेल्या या कामाला निधी मंजूर झाल्यानंतर आता अन्य तांत्रिक बाबींच्या पुर्ततेला विलंब होत असल्याने व प्रत्यक्षात काम निविदा स्तरावरही न आल्याने यावर्षीही हे काम पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही राजापूर शहर वासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
राजापूरात पावसाळयात दरवर्षी पूर आणि उन्हाळयात दरवर्षी पाणीटंचाई असे विरोधाभासी चित्र पहावायस मिळते. ज्या राजापुरात मोठया प्रमाणावर अर्जुना नदीला पूर येतो त्या राजापूरात उन्हाळयात नागरिकांना पाणीपाणी करावे लागते हे कुणालाही सांगितले परी पटणार नाही. प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती ही अशीच आहे. मात्र दुरदृष्टी आणि नियोजनाचा अभाव यामुळे गेली कित्येक वर्षे मार्च ते पावसाळा सुरू होईपर्यंत शहर वासीयांवर पाणी पाणी करण्याची वेळ येते. राजापूर शहराची पाणी योजना म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक तरीही पुरेसे पाणी नाही अशी आहे. तर प्रारंभी दहा कोटी व आता आठ कोटी अशा प्रकारे एकूण १८ कोटींचा निधी शासनाने मंजूर केलेला असतानाही पाण्यासारख्या अत्यावश्यक सेवा सुविधेबाबत होत असलेली दिरंगाई निश्चितच चिंताजनक अशी आहे.
राजापूर शहराचा पाणीपुरठा हा दोन पाणीपुरवठा स्त्रोतांवर अवलंबून आहे. यामध्ये गेली १४८ वर्षे नैसर्गिक रित्या पाणीपुरवठा करणारे कोदवली येथील ब्रीटीशकालीन सायबाचे धरण व शिळ येथील जॅकवेल. मात्र कोदवलीतील सायबाचे धरण गाळाने भरल्याने या ठिकाणाहून येणारा पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. तर शिळ जॅकवेलकडून विद्युत पंपाने पाणी खेचावे लागत असल्याने त्याचा आर्थिक भुर्दंडही मोठा बसत आहे. त्यातच शहरातील जीर्ण झालेली वितरण व्यवस्था याचा फटका पाणीपुरवठ्यावर होत असून शहर वासीयांना उन्हाळयात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या खालील बाजुला नवीन पर्यायी धरण बांधण्याचा प्रस्ताव करण्यात आला व त्याला शासनाकडून मंजूरीही मिळाली. यासाठी त्यावेळी विधानपरिषद सदस्या एड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या त्या वेळच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात या नवीन पर्यायी धरणासाठी दहा कोटीचा निधी मंजूर केला. या निधीमध्ये धरणाचे काम सुरू झाले मात्र कामाची एकूणच व्याप्ती वाढल्याने हा निधी अपुरा पडला. त्यामुळे सध्या धरणाचे काम अपुर्णावस्थेत आहे. त्यानंतर उर्वरित कामासाठी शासनाकडे आठ कोटी रूपये खर्चाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. शासनस्तरावरून याला मंजूरी देत आठ कोटीचा निधीही मंजूर करण्यात आला. विद्यमान आ. किरण सामंत यांनी यासाठी पाठपुरावा केला.
मात्र निधी मंजूर होऊनही हे काम रखडलेले आहे. न. प. स्तरावर प्रस्ताव, तांत्रिक मंजूरी, व निविदा या प्रक्रिया अद्यापही पुर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे आता मार्च महिना जवळ आला तरी निविदा प्रक्रिया न झाल्याने ती होणार कधी, काम सुरू कधी होणार आणि पुर्ण कधी होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकूणच लांबलेली प्रक्रिया पाहता यावर्षीही हे काम पुर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शहर वासीयांना यावर्षीही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. कोदवली धरणात गाळ उपसा करूनही पुरेसा पाणीसाठा होत नसल्याने यावर्षीही मार्च पासूनच एक दिवसाआड पाणीपुरवठयाची टांगती तलवार शहर वासीयांवर असणार आहे.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन न. प. प्रशासनाने आत्तापासूनच नियोजन सुरू केले आहे. नवीन नळ संयोजन देणे बंद केले आहे. तर पाणीसाठा टिकून रहावा यासाठी वनराई बंधाऱ्यांचे नियोजन केले आहे. एकूणच पाणीसाठा पहाता मार्च मध्ये कधीही एकदिवसाआड पाणीपुरवठयाची घोषणा प्रशासनाकडून होऊ शकते अशी परिस्थिती आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:50 PM 18/Feb/2025














