गुहागरमध्ये उद्या शिवजयंती सोहळा

गुहागर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन, गुहागर व तमाम गुहागरवासीय यांच्यावतीने दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने भव्य शिव पादुका पालखी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी 8 वा. शहरातील छ. शिवाजी महाराज चौक येथून शिव पादुका पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहेत.

छ. शिवाजी महाराजांच्या पादुकांची पालखीतून शिवरथ यात्रा गेली काही वर्ष श्रृंगारतळी येथून काढली गेली. परंतु, या यात्रेला उशीर होतं असल्याने यावर्षी गुहागर शहरातील छ. शिवाजी महाराज चौक येथून पादुकांची पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर बाजारपेठ मार्गे श्री देव व्याडेश्वर मंदिर, तेथून 9.30 वाजता वरचापाट येथील श्री दुगदिवी मंदिरात आगमन होईल. याठिकाणी शिवरायांच्या पादुकांची आणि दुर्गा भवानी माता यांची ब्रह्मवृंदाच्या मंत्रोघोषात पूजन करून भेटीचा सोहळा पार पडणार आहे. तसेच यावेळी शिव पादुका व दुर्गा भवानी मातेचे परिसरातील 101 महिलांच्या वतीने औक्षण करण्यात येणार आहे. ज्या महिलांना औक्षण करायचे असल्यास त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी देवस्थानच्यावतीने समस्त शिवप्रेमींसाठी प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तिथून शिव पादुकांची पालखी मिरवणूक वरचापाट बाग, रानवी मार्गे अंजनवेल बाजारपेठ मध्ये दाखल होणार आहे. याचवेळी गुहागर आणि श्रृंगारतळी येथून आलेल्या मिरवणुक अंजनवेल ग्रामस्थांच्या उपस्थितीत गोपाळगडापर्यंत भव्य मिरवणूक काढली जाईल. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पादुका पूजन व ध्वजारोहन करून शिवजयंती उत्सवाची सांगता होणार आहे. या शिव जन्मोत्सव सोहळ्यासाठी तालुक्यातील असंख्य शिवभक्त व गुहागरवासीय उपस्थित रहावे, असे आवाहन शिवतेज फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 18/Feb/2025