लांजा आठवडा बाजाराला शिस्तीचा अभाव

लांजा : तालुक्याचा आठवडा बाजार मंगळवारी भरतो. या दिवशी परजिल्ह्यातील तसेच स्थानिक फिरत्या व्यापाऱ्यांना बसण्यासाठी नगरपंचायतीने जागा उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे बाजाराला शिस्त लागून वाहतूक कोंडी, अपघात टाळले जाऊन पादचाऱ्यांना चालणेही सोयीचे होणार आहे.

लांजा तालुक्याच्या मंगळवारच्या आठवडा बाजारात तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने खरेदी करण्यासाठी येतात. फिरते व्यापारी हे रस्त्यावर दुतर्फा आपली दुकाने थाटून व्यवसाय करतात. महामार्गाशेजारी हा बाजार भरत असल्याने मंगळवारी महामार्गावर वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या दुतर्फा फळ विक्रेते, भाजी विक्रेते, रेडिमेड कपडे विक्रेते आदी छोटे-मोठे व्यापारी व्यवसाय करतात. या विक्रेत्यांकडून माल खरेदी करताना ग्राहक आणि व्यापारी यांच्यामुळे अर्धा अधिक रस्ता व्यापला जातो. महामार्गावर वाहनांची सतत असणारी वर्दळ यामुळे वाहतूक कोंडी होते आणि पादचाऱ्यांना चालणेही कठीण होते.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू असल्याने आधीच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यातच मंगळवारच्या आठवडा बाजारात मोठी गर्दी होत असल्यामुळे येथून वाहने चालवणे कठीण होते. अनेक वेळा छोटे अपघात होतात. बाजारात फिरत्या व्यापाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी व्यापाऱ्यांना जागा ठरवून देऊन बाजार भरला तर व्यापारी आणि ग्राहकांनाही सोयीचे होणार आहे.

लांजा शहरात श्री केदालिंग देवमळा, गोडेसखल रस्त्यानजीक असलेली दूध शीतगृहाची जागा मोकळी आहे तसेच इतरत्र जागेची उपलब्धता करून बाजार भरण्यासाठी प्रयत्न केला गेल्यास सर्वांना सोयीचे आणि सुरक्षित होणार आहे. फिरत्या व्यापाऱ्यांना बसण्यासाठी कायमस्वरूपी जागा नसल्याने व्यापाऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.

लांजा बाजारात फिरत्या व्यापाऱ्यांची संख्या खूप आहे. एकाच ठिकाणी व्यापाऱ्यांना जागा ठरवून दिल्यास व्यापारी आणि ग्राहक यांना मोकळा श्वास घेता येईल. –दत्ता कदम, जिल्हाप्रमुख, ठाकरे शिवसेना

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 18/Feb/2025