चिपळूण : चिपळूण तालुका अंतर्गत येणारी अनेक शासकीय कार्यालये भाड्याच्या जागेत कार्यरत आहेत. या शासकीय कार्यालयांसाठी एकत्रित प्रशासकीय इमारत नसल्याने अनेक खासगी इमारतींच्या जागेमध्ये भाडेतत्त्वावर कार्यालये थाटण्यात आली आहेत तर दुसरीकडे अनेक शासकीय इमारती वर्षानुवर्षे धूळ खात पडल्या आहेत. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.परिणामी दरवर्षी शासनाला भाडयाचा भुर्दंड पडत आहे.
तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत अनेक शासकीय इमारती मोडकळीस आल्या आहेत. या इमारतीमध्ये गवत आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून त्याच्या डागडुजीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे किंवा त्या इमारती नव्याने बांधण्यासंदर्भात शासनाकडून कोणताही प्रस्ताव करण्यात आलेला नाही. त्यामुळे शासकीय जागा व इमारती असूनदेखील त्या विनावापर धूळ खात पडून आहेत. शहरातील काविळतळी येथील परशुराम नगरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन ते चार इमारती तर घाणेकर हॉस्पिटललगत एक इमारत धूळखात पडलेल्या आहेत. या शिवाय कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभागाची इमारत देखील गेले काही वर्षे पडीक स्थितीत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने या पडीक इमारती नव्याने बांधणे किंवा दुरूस्त करण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव केलेला नाही. त्यामुळे या इमारती विनावापर पडून असून अनेक शासकीय कार्यालये खासगी जागेत भाडेतत्त्वावर थाटण्यात आली आहेत. यामध्ये रजिस्टर कार्यालयाचादेखील समावेश आहे. त्यामुळे शासनाच्या पैशाची नाहक उधळपट्टी होत आहे, अशी तक्रार चिपळूण पं. स.चे माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे.
शासनाच्या इमारती पडीक ठेवून भाड्याच्या जागेत कार्यालय थाटणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तालुक्यात ज्या शासकीय व निमशासकीय इमारती पडिक आहेत त्यांची सा. बां. ने तत्काळ पाहणी करून त्या नवीन बांधण्यासाठी किंवा त्यांच्या डागडुजीसाठी प्रस्ताव तयार करावेत व शासनाकडून निधी मिळवून घ्यावा. ज्या इमारती अत्यंत डबघाईला आल्या आहेत त्या ठिकाणी नवीन इमारती बांधण्याचा प्रस्ताव करा. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे, असे मुकादम यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 19/Feb/2025














