खंडपीठासाठी कोल्हापुरात महारॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ स्थापनेच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, सर्वपक्षीय खंडपीठ कृती समिती, पक्षकार, सिटीझन फोरमसह सेवाभावी संस्था, संघटना, तसेच औद्योगिक, व्यावसायिक संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लक्षवेध महारॅलीला मंगळवारी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यावेळी घोषणांनी शहर दुमदुमून गेले. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनचे पदाधिकारी, वरिष्ठ, ज्युनिअर वकील, सामाजिक संस्था, संघटना महारॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूर खंडपीठाबाबत वेळीच ठोस निर्णय न झाल्यास भविष्यात पुन्हा ‘आरपार’च्या लढाईचा निर्धार यावेळी करण्यात आला.

चाळीस वर्षे प्रलंबित असलेल्या कोल्हापूर, सांगली, सातार्‍यासह सहा जिल्ह्यांच्या अस्मितेचा, जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कोल्हापूर खंडपीठाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आक्रमक लोकलढ्याचा निर्धार करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व सर्वपक्षीय खंडपीठ कृती समितीच्या वतीने मंगळवारी कोल्हापुरात लक्षवेध महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा बार असोसिएशन, तालुका बार असोसिएशनसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील पदाधिकारी व सेवाभावी संस्था, संघटनांचे पदाधिकारी दुचाकीसह महारॅलीमध्ये सहभागी झाले होते.

शिष्टमंडळामार्फत प्रधान जिल्हा व सत्र न्यायालय यांना निवेदन

जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. सर्जेराव खोत, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष महादेवराव आडगुळे, माजी अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. शिवाजीराव राणे, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे, अ‍ॅड. गिरीश खडके, अ‍ॅड. रणजित गावडे, अ‍ॅड. अजितराव मोहिते, सोनाली शेठ, सरिता घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांना निवेदन सादर केले.

चाळीस वर्षांपासून लोकलढा

कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेसाठी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांत 40 वर्षांपासून अखंडपणे लोकलढा सुरू आहे. लोकभावना तीव— असल्याने खंडपीठ कृती समितीचे निवेदन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना सादर होण्याबाबत शिष्टमंडळाने विनंती केली. प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी निवेदनाचा स्वीकार केला.

यानंतर जिल्हा न्यायसंकुल आवारातून मोटारसायकल रॅलीस प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली दुपारी साडेबाराला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. जिल्हा बार असोसिएशनचे अ‍ॅड. सर्जेराव खोत, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, विवेक घाटगे, खंडपीठ कृती समितीचे सदस्य, माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड. धनंजय पठाडे, स्मॅक सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबा कोंडेकर, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष स्वरूप पाटील, आय.टी.चे प्रताप पाटील, कोल्हापूर इंजिनिअर्सचे उपाध्यक्ष कमलाकर कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळे, आयआयएफचे अध्यक्ष विजय खोबरे, अ‍ॅड. गिरीश खडके, सामाजिक कार्यकर्ते अशोक भंडारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

साडेतीन लाखांवर खटले प्रलंबित

अ‍ॅड. खोत म्हणाले, कोल्हापूर खंडपीठासाठी सहा जिल्ह्यांचा लढा सुरू आहे. हजारो पक्षकार न्यायापासून वंचित आहेत. साडेतीन लाखांवर खटले हायकोर्टात प्रलंबित आहेत. कोल्हापूरला खंडपीठ, सर्किट बेंच होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी झालेल्या चर्चेत आर. के. पोवार, अ‍ॅड. संपत पवार, अजित मोहिते, सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव, श्रद्धा कुलकर्णी, अ‍ॅड. रोहिणी भोसले, स्नेहलता सावंत, अ‍ॅड. तन्मय मेवेकरी, अ‍ॅड. प्रमोद दाभाडे आदी सहभागी झाले होते.

मोठा पोलिस बंदोबस्त

खंडपीठाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील दसरा चौक, सीपीआर चौक, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, व्हीनस कॉर्नर, स्टेशन रोड, ताराराणी पुतळा, धैर्यप्रसाद चौकमार्गे लक्षवेध महारॅली दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. यावेळी रॅली मार्गासह जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संयुक्त बैठकीसाठी प्रयत्नशील : सतेज पाटील

जिल्हा बार असोसिएशन व खंडपीठ कृती समितीच्या वतीने आयोजित महारॅलीला कसबा बावडा येथील न्यायसंकुल आवारातून प्रारंभ होण्यापूर्वी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला. खंडपीठासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्यात बैठक होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

रणरणत्या उन्हात शहरातून महारॅली

सकाळी साडेदहानंतर शहरात कडाक्याचा उष्मा होता. साडेअकरा वाजता त्यात कमालीची वाढ झाली. रणरणत्या उन्हात वकिलांसह सामाजिक कार्यकर्त्यांची रॅली उत्स्फूर्तपणे पार पडली. शहरातील काही सामाजिक संघटनांनी महारॅलीमध्ये सहभागी झालेल्यांसाठी पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 19-02-2025