गुहागरमध्ये आज शिवजन्मोत्सव सोहळा

गुहागर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाऊंडेशन, गुहागर व गुहागरवासीय यांच्यावतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने शिव पादुका पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वा. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून शिवपादुका पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.

यावर्षी गुहागर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पादुकांची पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर बाजारपेठ मार्गे श्री देव व्याडेश्वर मंदिर, तेथून ९:३० वा. वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात आगमन होईल. या ठिकाणी शिवरायांच्या पादुकांची आणि दुर्गा भवानी माता यांचे ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात पूजन करून भेटीचा सोहळा होणार आहे.

तसेच यावेळी शिवपादुका व दुर्गा भवानी मातेचे परिसरातील १०१ महिलांच्या वतीने औक्षण करण्यात येणार आहे. ज्या महिलांना औक्षण करायचे असल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तिथून शिव पादुकांची पालखी मिरवणूक वरचापाट बाग, रानवी मार्गे अंजनवेल बाजारपेठेमध्ये दाखल होणार आहे. याचवेळी गुहागर आणि शृंगारतळी येथून आलेल्या मिरवणूक अंजनवेल ग्रामस्थांच्या उपस्थितीत गोपाळगडापर्यंत काढण्यात येतील. पादुका पूजन व ध्वजारोहण करून शिवजयंती उत्सवाची सांगता होणार आहे.

या शिव जन्मोत्सव सोहळ्यासाठी तालुक्यातील शिवभक्त व गुहागरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवतेज फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 19/Feb/2025