कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावे; अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून डोळ्याच्या आजाराने ग्रस्त होते. तो आजार बरा होत नाही, तेच त्यांना आणखी एका आजाराने ग्रासले.

मुंडेंना ‘बेल्स पाल्सी’ हा आजार झाला आहे. सलग 2 मिनिटेही नीट बोलता येत नाही, अशी माहिती त्यांनी स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट करुन दिली आहे. दरम्यान, याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. गेल्या काही काळापासून त्यांचे वाल्मिक कराडबरोबर असलेल्या संबंधांमुळे विरोधक सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीतर मुंडेंविरोधात मोर्चा उघडला आहे. त्या दररोज मुंडेंवर भ्रष्टाचार/घोटाळ्याचे नवनवीन आरोप करत आहेत. पण, अशा परिस्थितीतही त्यांनी धनंजय मुंडेंना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

काय म्हणाल्या अंजली दमानिया?
अंजली दमानिया यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, ‘धनंजय मुंडेंना Bell’s Palsy झाल्याचे कळले. कोणालाच कधी आजार होऊ नये. ते लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा. Bell’s Palsy हा एक nerve चा आजार आहे. हा कधी स्ट्रेस मुळे व कधी herpes ची साइड रिएक्शन म्हणून होतो. ते लवकर म्हणजे 4 आठवड्यात ठीक होतीलच. (हा माझा विषय आहे म्हणून मी म्हणत आहे). माझी लढाई त्यांच्या वृत्ती विरुद्ध आहे, त्यांच्या दहशती विरुद्ध आहे, त्यांच्या भ्रष्टाचारा विरुद्ध आहे. ती चालू राहीलच पण त्यांना तब्येती साठी शुभेच्छा,’ अशी पोस्ट त्यांनी केली.

धनंजय मुंडेंनी काय माहिती दिलेली?
आपल्या आजाराबाबत माहिती देताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचार सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईन,’ अशी पोस्ट मुंडेंनी केली.

बेल्स पाल्सी आजाराबाबत जाणून घ्या…
बेल्स पाल्सी ही एक मेंदूशी संबंधित म्हणजेच समस्या आहे, ज्यामध्ये चेहऱ्याची नस (फेशियल नर्व) कमजोर होते किंवा प्रभावित होते, त्यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला तात्पुरता लकवा सदृश्य स्थिती निर्माण होते. काहीवेळा चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंचे स्नायूही या आजारात बाधित होतात. ही तात्पुरती समस्या असल्यामुळे, रुग्ण काही दिवसांत बरा होतो. मंत्री धनंजय मुंडेदेखील लवकरच या आजारातून बाहेर येतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 21-02-2025