खेड : रानडुक्कर शिकार प्रकरणातील संशयित पसार

खेड : तालुक्यातील बोरघर येथील जंगलमय भागात रानडुक्कर शिकार प्रकरणात आणखी एकाचा सहभाग असल्याचे समजते. या संशयिताच्या घरात कापलेल्या रानडुकराचे मांस ठेवल्याची माहिती समोर आली आहे. हा संशयित घराला कुलूप ठोकून पसार झाल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली आहे.

दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील, वनपाल सुरेश उपरे यांच्यासह पथक फरारीच्या मागावर असून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कसून तपास सुरू आहे. रानडुकरांची शिकार करणाऱ्या अजित नारायण कदम (रा. बोरघर -घोलपवाडी), आकाश बाळकृष्ण पवार (रा. बोरघर आदिवासीवाडी) या दोघांना न्यायालयाने दोन दिवसाची कोठडी सुनावली. दोघेही वनविभागाच्या कोठडीत आहेत.

फासकीचा वापर करून शिकार करणाऱ्या दोघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या शिकार प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही पडताळा वनविभागाकडून सुरू असतानाच आणखी एकाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

अटकेतील संशयितांनी शिकार केलेल्या रानडुकरांचे कापलेले मांस पसार झालेल्या संशयिताच्या घरी ठेवल्याची विश्वसनीय माहिती समोर आली. रानडुकराच्या शिकारीप्रकरणी वनविभागाच्या पथकाने अटक केलेला अजित नारायण कदम हा बोरघर ग्रामपंचायतीत शिपाई पदावर कार्यरत आहे. दुसरा संशयित आकाश बाळकृष्ण पवार हे याच ग्रामपंचायतीचा सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्या अटकेने खळबळ उडाली आहे. त्याच्या घरात ३० किलो डुकराचे मांस असल्याची चर्चाही सुरू आहे.

हा संशयित घराला कुलूप ठोकून पसार झाल्याने वनविभागाच्या पथकाचा संशय आणखी बळावला आहे. अटकेतील दोघांनी शिकारीसाठी यापूर्वी बंदुकीचा वापर केला होता का याचा तपास केला जात आहे. या दोघांकडून आणखी काही धागेदोरे लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील, खेडचे वनपाल सुरेश उपरे व पथकाने तपास गतिमान केला आहे.

टोळी कार्यरत असण्याची शक्यता
दरम्यान, २० ते २५ जणांची टोळी कार्यरत असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यातील काहींकडे विनापरवाना ठासणीच्या बंदुका व बॉम्बगोळेही असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्या टोळीचा शोध घेऊन शिकारीच्या वापरातील विनापरवाना ठासणीच्या बंदुका व बॉम्बगोळे ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान वनविभागाच्या पथकासमोर आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 24/Feb/2025