राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा, रामदास आठवलेंची मागणी

पालघर : “राहुल गांधी (RahulGandhi) आणि त्यांचा काँग्रेस (Congress) पक्ष संपेल मात्र देशातील आरक्षण कधीही संपणार नाही. बाहेर देशात जाऊन देशाबद्दल अशी वक्तव्य करणं राहुल गांधींना शोभत नाही”, असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ( RamdasAthawale) यांनी राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा, अशी मागणी केली आहे.

ते पालघर (Palghar) येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, अजित पवारांमुळे महायुतीच कोणतही नुकसान नाही . लोकसभेत आलेल्या 17 जागांमध्ये अजित पवारांचाही वाटा. राज ठाकरेंचा महायुतीला फायदा नाही. मी असल्यामुळे महायुतीने राज ठाकरे यांना घेऊ नये, असं आवाहनही रामदास आठवले यांनी केलं.

राहुल गांधी काय काय म्हणाले होते?

राहुल गांधी काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यांनी या दौऱ्यात जॉर्जटाऊन विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी त्यांना देशातील आरक्षणाबाबत प्रश्न विचारले. याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, प्रत्येक राज्यातील आरक्षणापासून वंचित असलेल्या जाती आता आरक्षणाची मागणी करत आहेत, आंदोलन करत आहेत. त्यांचा आरक्षणासाठी संघर्ष सुरु आहे. त्याचवेळी सामाजिक आधारावर नको तर आर्थिक परिस्थितीवर आरक्षण द्या, अशी मागणी होऊ लागलेली आहे. मात्र, सध्या आरक्षण संपवण्याची वेळ नाही. ज्यावेळी योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. सध्या योग्य वेळ नसल्याचेही राहुल गांधी म्हणाले होते.

आरक्षण रद्द करण्यासाठी सध्या योग्य वेळ नाही

आपण आर्थिक बाबींवर नजर टाकली तर 100 रुपयांपैकी आदिवासींना केवळ 10 पैसे मिळत आहेत. दलितांना 5 रुपये तर ओबीसींना पण इतकीच रक्कम वाट्याला येते. त्यांचा देशातील वाटा कमी आहे. भारतातील प्रत्येक क्षेत्रातील उद्योजकांची यादी काढा. मला त्यात अग्रभागी दलित, आदिवासींचे नाव दाखवा, ते दिसणार नाहीत. मला वाटते देशातील 200 जणांमध्ये एखादा ओबीसी असेल आणि ते देशात 50 टक्के आहेत. पण आम्ही आजारपणावर इलाज करत नाही. आरक्षण एकमात्र साधन नाही. इतर पण साधन आहेत, असंही राहुल गांधी यांनी नमूद केलं.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर महायुतीकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय. तर शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांनी तर राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देऊ, असं बेताल वक्तव्य केलंय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:24 17-09-2024