गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ मोहीम : मारुती अंबरे

रत्नागिरी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाने महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ तथा फेस्कॉमच्या गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ, ही संकल्पना रत्नागिरी जिल्ह्यात मोहीम स्वरूपात राबविण्याचा निर्धार केला आहे. त्याला संपूर्ण जिल्ह्यातून ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवाचा समाजाला फायदा करून देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाच्या छत्राखाली संघटित व्हावे, असे आवाहन कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती अंबरे यांनी संघाच्या मासिक मेळाव्यात बोलताना केले.

कुवारबाव येथे आयोजित स्नेहमेळाव्यात फेब्रुवारी महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे सत्कार करण्यात आले. यावेळी श्यामसुंदर सावंतदेसाई यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली, तर प्रसिद्धीप्रमुख प्रभाकर कासेकर यांनी ज्येष्ठांचा हक्काचा मार्गदर्शक असलेल्या मनोहारी मनो युवा मासिकाचे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी वर्गणीदार होऊन फेसकॉमची चळवळ घरोघरी पोहोचविण्याचे आवाहन केले.

माजी प्राचार्य डॉ. दत्ता पवार यांनी अभिजात मराठी भाषेचा अभिमान नव्या पिढीत रुजविण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाचन स्पर्धेचा उपक्रम राबवून समाजात वाचन संस्कृती निर्माण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घ्यावा, असे सूचित केले. डॉ. रमेश साळुंखे, नारायण नानिवडेकर, उपाध्यक्ष राजेंद्र कदम, सुप्रिया मोहिते, प्रकाश शिंदे तसेच राजापूर तालुक्यातील मिठगवाणे संघाचे अध्यक्ष विलास चेऊलकर आणि सचिव रमेश राणे यांनी ज्येष्ठांची चळवळ गतिमान करण्यासाठी विधायक सूचना मांडल्या.

मिठगवाणे येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास चेऊलकर, सचिव रमेश राणे, तसेच एकनाथ आडिवरेकर, श्रीधर पावसकर आणि श्रीकृष्ण मयेकर या पदाधिकाऱ्यांनी कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाला सदिच्छा भेट दिली. ज्येष्ठांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 25/Feb/2025