देवरुख : प्रधानमंत्री पोषण आहार सक्ती कार्यक्रमांतर्गत शालेय परसबाग स्पर्धा शासनाने आयोजित केली. या स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा ओझरे खुर्द शाळेने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तब्बल ३० प्रकारच्या भाज्या शालेय परिसरात पिकवून पोषण आहारात नियमित उपयोग केला. उरलेली भाजी विक्री करून अर्थाजन प्राप्त केले आहे. शाळेचे जिल्हास्तरीय मूल्यांकनही झाले आहे.
विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच कृषिविषयक माहिती व्हावी, याचबरोबर शेतात कष्ट करून भाजी कशी पिकवतात याचा स्वानुभव व्हावा, पोषण आहारात पिकवलेल्या भाजीचा उपयोग व्हावा याचबरोबर विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान देखील समजावे, या मुख्य उद्देशाने ही स्पर्धा शासनाने आयोजित केली.
शाळेमध्ये पावसाळी भाज्या व उन्हाळी भाज्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने दोन टप्प्यात भाजीपाला पिकविण्यात आला. पहिल्या पावसाळ्याच्या टप्प्यामध्ये अळू, चवळी, घेवडा, तोंडली, भेंडी, दोडका, काकडी, वांगी, पालेभाजी, चिबूड, रताळे, वाल, भोपळा, पावटा, मिरची व झेंडूची शेती व औषधी वनस्पती यांची लागवड केली. या तयार पोषण आहारात उपयोगात आणण्यात आल्या. यातच १ हजार ८७५ रुपयांच्या भाज्यांचा पोषण आहारात उपयोग करण्यात आला. ४४० रुपयांची भाजी ग्रामस्थांनी विकत घेतली.
दुसऱ्या टप्प्यामध्ये अळू, मुळा, चवळी, लाल माठ, टॉमॅटो, हिरवा माठ, तोंडली, मेथी, भेंडी, पालक, दोडका, मोहरी, काकडी, पोकळा, बांगी, अननस, गवार, कलिंगड, भोपळी मिरची, केळी, रताळे, पपई, वाल, नारळ, कोथिंबीर, मायक्रो ग्रीन, पावटा, औषधी वनस्पती, मिरची व झेंडू या भाज्या पिकविल्या. या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या मेहनतीला चांगले यश मिळाल्याचे मुख्याध्यापक राजेंद्र मावळणकर यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 25/Feb/2025














