राज्यभरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

मुंबई : ‘पुढच्या वर्षी लवकर या’, ‘निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी…’, असे म्हणत राज्यभरातील करोडो गणेशभक्तांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

मुंबई, पुण्यासह राज्यातीलच नव्हे, तर जगभरातील विविध ठिकाणी गणेश चतुर्थीला लाडके बाप्पा घरोघरी किंवा भव्य दिव्य गणेशमूर्ती मोठ्या उत्साहात सार्वजनिक मंडळात विराजमान झाल्या होत्या. मात्र मंगळवारी १० दिवसांचा पाहुणचार घेऊन भाविकांकडून निरोप देण्यात आला.

यामध्ये मुंबईत लालबागचा राजा, केशवजी नाईक चाळमधील गणपती (गिरगाव), चिंतामणी (चिंचपोकळी), नरे पार्कचा गणपती (परळ), गणेश गल्लीचा राजा, तेजुकाया गणपती (लालबाग), जीएसबी गणपती (किंग्ज सर्कल) आदी गणपती विशेष प्रसिद्ध आहेत. तसेच पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदी पारंपारिक गणपती आहेत. गणेशोत्सवात महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून या गणपतींच्या दर्शनासाठी भाविक मुंबई, पुण्यात येत असतात. याशिवाय अन्य प्रमुख शहरांतही पालखी, ढोल-ताशा, लेझीम, वाजत गाजत पारंपारिक वेशभूषेत निरोप देण्यात आला. यावेळी विविध ठिकाणी विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर तर अरबी समुद्र आणि भाविकांचा जनसागर एकमेकांमध्ये समाविष्ट झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीचे विसर्जन, तर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पालाही निरोप, बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची गर्दी पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती साकारली होती. पुण्यात गणेशोत्सवाचा आगळा-वेगळा जल्लोष दिसून आला. यासोबतच राज्यातील नागपूर, अमरावती, वर्धा, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, छत्रपती संभाजीनगर, बिड येथे गणेश विसर्जनाची धूम दिसून आली.

धुळ्यात विसर्जनाच्या आनंदावर विर्जण टाकणारी घटना घडली. धुळे शहराच्या जवळ असलेल्या चितोड गावात गणेश विसर्जनाची मिरवणूक निघण्यापूर्वीच एका ट्रॅक्टरखाली येऊन 3 चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला. या चिमुकल्यांचे वय अनुक्रमे 4, 7 आणि 14 वर्षे होते. येथे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरजवळ या मुली खेळत असताना हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तर विठ्ठलाची नगरी असलेल्या पंढरपुरात मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड जोडत असताना अमोल खुटाले नामक तरुणाला ब्रेन हॅम्रेज होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पंढरपूर शहरातील सर्वात मोठे मंडळ असणाऱ्या श्रीमंत लोकमान्य मंडळाने गणेश विसर्जन मिरवणूक रद्द केली आहे. दरम्यान, अहमदनगरमध्येही दुर्दैवी घटना घडली आहे. ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे हे अहमदनगर पोलीस दलात कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काल तोफखाना आणि कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता. दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणुकीत ज्ञानेश्वर मोरे यांनी मराठी चित्रपटाच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला. गणपती विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर ते आपल्या घरी परतले. घरी गेल्यावर ज्ञानेश्वर मोरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 18-09-2024