स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार

Swargate: पुण्याच्या स्वारगेट एसटी स्टँड परिसरात एका पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फलटणला जाण्यासाठी ती स्वारगेट बस स्थानकात आली. जिथे नेहमी गाडी लागते, त्या फलाटावरील खुर्चीवर ती बसली होती. आरोपी तिच्या जवळ आला. गोड बोलत ओळख करून घेतली आणि नंतर तिकडे बस लागलेली आहे म्हणत शिवशाही बस मध्ये नेऊन बलात्कार केला.

हादरवून टाकणारी ही घटना पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलीये. आरोपीचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणाबद्दल पोलिसांनी सविस्तर माहिती दिलीये.

स्वारगेट बस स्थानकात झालेल्या बलात्कार प्रकरणाची पुणे पोलिसांकडून माहिती देण्यात आली. आरोपीने आधी तरुणीचा विश्वास संपादन केला आणि नंतर तिला बस मध्ये नेऊन अत्याचार केला, असे पोलिसांनी सांगितले.

आधी आरोपी तरुणीच्या बाजूला जाऊन बसला

“ही मुलगी पुण्यात कामाला आहे. ती इथून फलटणला गावी चालली होती. सकाळी साडेपाच पावणे सहा दरम्यान ही घटना घडली आहे. ती स्वारगेट बसस्थानकात बसची वाट बघत थांबली होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ गेला. आधी आरोपी तिच्या आजूबाजूला फिरताना सीसीटीव्हीमध्ये दिसतो.

नंतर तिच्या शेजारी जाऊन बसला. दोघांचं बोलणं सुरू असताना बाजूला असलेला एक माणूस उठून जातो. आरोपीने गोड बोलून तिच्याशी ओळख करून घेतली.

तरुणीला म्हणाला, सातारची बस इथे लागत नाही, तिकडे लागलीये

कुठे चाललीये ताई, असे आरोपीने तिला विचारले. मुलगी म्हणाली मला फलटणला जायचं आहे. तर आरोपी म्हणाला की, सातारची बस ती इथे लागत नाही. ती तिकडे लागलेली आहे. त्यावर मुलगी त्याला म्हणाली की, नाही. बस इथेच लागते. म्हणून मी इथे बसलीये.

त्यावर आरोपी मुलीला म्हणाला की, बस तिकडे लागलीये. चल मी तुला तिकडे घेऊन जातो. त्यानंतर मुलगी त्याच्याबरोबर जाते. तिथे गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता. अंधार पाहून आरोपीला विचारले की, बसमध्ये अंधार आहे. त्यावर आरोपी म्हणाला की, ही रात्री उशिराची बस आहे आणि लोक झोपलेले आहेत. त्यामुळे लाईट बंद आहेत. तू वरती चढून टॉर्च लावून चेक करू शकते.

तरुण बसमध्ये चढली अन् आरोपीने केला बलात्कार

ती बसमध्ये गेली आणि टॉर्च लावायला गेली. त्यावेळी आरोपी मागून चढला आणि दरवाजा लावून घेतला. त्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मित्राला फोन लावला

‘त्यानंतर आरोपी आधी बसमधून उतरला. त्यापाठोपाठ दोन मिनिटांनी मुलगी उतरली. ती फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसली. तिने तिथून मित्राला फोन लावला. मित्राच्या सल्ल्यावरुन तिने लगेच स्वारगेट पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर लगेचच आम्ही कारवाई सुरु केली’ अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी शिरुर गावचा

‘आम्ही सीसीटीव्ही फुटेज काढलं. आरोपीची ओळख पटली आहे. आरोपी शिरुर गावचा आहे. त्याच्यावर 392 चा गुन्हा दाखल आहे. आरोपीचा शोध सुरु आहे. कालपासून आठ टीम काम करत आहेत’ असं पोलिसांनी सांगितलं.

…तर तिला काही मदत मिळू शकली असती

बसमध्ये बलात्कार होतो, आजूबाजूला कोणाला कळत नाही. बस लॉक केली नाही ही चूक चालकाची की वाहकाची? सिस्टिममध्ये त्रुटी आहेत असं वाटतं नाही का? या प्रश्नावर ‘पोलिसांच पेट्रोलिंग सुरु असतं. पण प्रत्येक बस पोलीस चेक करु शकत नाहीत. ही बस आतमध्ये होती. घटनेनंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेली. तिथे आरडाओरडा केला असता, तर तिला काही मदत मिळू शकली असती’ असं पोलीस म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:49 26-02-2025