चिपळूण : कुंभार्ली घाट उतरत असताना कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे कुंभार्ली घाटाच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोट्यवधीचा खर्च होत असताना या घाटातील संरक्षक कठड्यांनाच संरक्षण देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कुंभार्ली घाटमाथ्याच्या रस्त्यावर वारेमाप खर्च पडत असताना वाहनचालकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा कुंभार्ली घाट हा अत्यंत महत्त्वाचा घाट आहे. साधारण २ हजार १०० फूट उंचीचा आहे, तर १२ ते १६ कि.मी. लांब आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा घाट आहे. कराडकडून चिपळूणकडे जाताना कोयना सोडल्यानंतर काही अंतरावर हा घाट सुरू होतो, तो थेट कोकणातील व रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतील पोफळी येथे उतरतो. चिपळूणकडे जाताना डाव्या बाजूला खोल दरी आणि उजव्या बाजूला सह्याद्रीचे उंच कडे असा घाट उतरत यावा लागतो.
या घाटाच्या सुरक्षिततेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळेझाक केली. मध्यंतरी चिपळूण-कराड रस्ता राष्ट्रीय महामार्गकडे वर्ग केला. हा रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी निविदादेखील झाली. मात्र, घाटमाथ्यातील रस्त्याची निविदा अद्याप निघालेली नाही. त्यामुळे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच आहे. घाटातून वाहतूक सुरळीत होईल, अशाप्रकारे हा रस्ता रुंद आहे. अलिकडे डांबरीकरण देखील सुस्थितीत आहे.
दररोज या घाटरस्त्याने उत्तर रत्नागिरीतील एस.टी.च्या गाड्या तसेच खासगी गाड्या, कार यांची चोवीस तास वाहतूक सुरू असते. मात्र, अनेकवेळा अवजड वाहतुकीमुळे येथे अपघात देखील घडतात. रविवारी घडलेला अपघात हा ताजा आहे. अशाचप्रकारे समोरून एखादे अवजड वाहन आले असावे आणि समोरच्या दिव्यांच्या प्रखर उजेडाने खेडेकर यांची कार कदाचित रस्त्याच्या कडेला जाऊन दरीत कोसळली असावी, असा अंदाजदेखील वर्तविला जात आहे.
दुर्दैवाने त्या ठिकाणी रस्त्यच्या कडेला संरक्षण कठडा देखील नव्हता. जर त्या ठिकाणी संरक्षक कठडा असता तर ही कार त्या कठड्यावर आदळून अडली असती व आतील एअर बॅग उघडून मोठा अपघात टळला असता. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या घाटाकडे दुर्लक्षच केले होते. चिपळूणच्या तत्कालीन प्रांताधिकारी कल्पना भोसले यांनी सीएसआर फंडातून या घाटातील वळणावळणांवर रिफ्लेक्टर्स लावले होते.
घाटातील अनेक धोकादायक वळणांवर आजही संरक्षक कठडे नाहीत. मध्यंतरी तर काही ठिकाणी बांधकाम विभागाने बांबूचा आधार दिला होता तर काही ठिकाणी पिंपदेखील लावली होती. काही ठिकाणी तारेच्या कुंपणासारखा देखील प्रकार आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या या कार्यवाहीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी घाटामध्ये योग्य त्या प्रमाणात साईडपट्टी देखील ठेवलेली नाही. घाटात काही ठिकाणी पांढरे पट्टेदेखील मारलेले नाहीत. जे काही संरक्षक कठडे आहेत त्यांचे काम निकृष्ट झाल्याने ते अखेरची घटका मोजत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 27/Feb/2025














