रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गावागोवी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुगणनेची मोहीम राबवली जात आहे. पशुगणना मोहिमेस केंद्र शासनाने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यातील १ हजार ६९४ गावांपैकी आतापर्यंत ६०४ गावातील पशुगणना पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात पशुगणनेचे ५० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली.
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दर पाच वर्षानी पशुगणना करण्यात येते. यावर्षी २५ नोव्हेंबरपासून रत्नागिरी जिल्ह्यात पशुगणनेस सुरूवात झाली आहे. राज्य शासनाने २८ फेब्रुवारीपर्यंत पशुगणना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट पशुसंवर्धन विभागासमोर ठेवले होते. मात्र, जवळपास सर्वच तालुक्यातील काही गावे दुर्गम व डोंगरी भागात आहेत. त्यामुळे गणनेसाठी गेलेल्या प्रगणकांना नेटवर्कच्या अडचणी येत होत्या.
पशुगणनेच्या माध्यमातून राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या जनावरांच्या १६ प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जात आहे. ग्रामीण व शहरी भागासाठी एकूण १५० प्रगणक व पर्यवेक्षकांमार्फत ही गणना करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १ हजार ६९४ गावे आहेत. त्यापैकी ६०४ गावात पशुगणनेचे काम पूर्ण झाले आहे. १२७ गावांमध्ये अजूनही या पशुगणनेला प्रारंभ झालेला नाही. उर्वरित गावांमध्ये मात्र पशुगणना सुरू आहे. आतापर्यंत पशुधनची संख्या १ लाख ३८ हजार ३०४ तर पहुंची संख्या २ लाख ८६ हजार इतकी आहे.
काम पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ मार्चपर्यंत पशुगणनेसाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व गावातील पशुगणना पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 28/Feb/2025














