संगमेश्वर : मठधामापूर परिसरात गवारेड्यांचा धुमाकूळ

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील मठधामापूर परिसरात गवारेड्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ते पिकाची मोठी नासधूस करत आहेत. त्यामुळे येथील शेतकरी हैराण झाला आहे. दुसरीकडे सायंकाळच्या दरम्यान गवारेड्यांचे दर्शन होत असल्याने येथील ग्रामस्थ एकटे फिरण्यास घाबरत आहेत.

मठधामापूर गावातून सप्तलिंगी नदी ही बारमाही वाहते. त्यामुळे येथील शेतकरी बारमाही विविध पिके घेत असतात. सध्या सुरु असलेल्या हंगामात कलिंगड, कुळीद, पावटा, वांगी व भाजीपाला यांची लागवड येथील शेतकऱ्यांनी केली आहे. गतवर्षीपासून ताम्हाने पंचक्रोशीत गवारेड्यांचा वावर वाढलेला दिसून येत आहे. यामुळे येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

यावर्षी मठधामापूर परिसरात गवारेड्यांनी शेतकऱ्यांना अक्षरशः हैराण केले आहे. शेतात शिरून पिकाची मोठी नासधूस ते करत आहेत. यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहे. येथील मंगेश गणेश गुरव याने आपल्या शेतात कलिंगड, वांगी, पावटा व पालेभाजी यांची लागवड केली आहे. यातील कलिंगड पीक चांगले तयार झाले होते. मात्र गवारेड्यांनी याची नासधूस केली आहे. त्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 28/Feb/2025