रत्नागिरी : विश्वकर्मा सामूहिक सुविधा केंद्रप्रश्नी उपोषण सुरू

रत्नागिरी : देवरुखमधील साडवली विश्वकर्मा सामूहिक सुविधा केंद्र कार्यन्वित करून देण्यासाठी उद्योग विभागाकडे चार वर्षे सतत पाठपुरावा करूनही दखल घेतली गेली नाही. त्या उभारणीपोटी सुमारे १ कोटी २५ लाखांचे नुकसान झाले त्याचबरोबर त्यावर अवलंबून असलेल्या लोहारकाम करणाऱ्या कारागिरांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी या केंद्राचे अध्यक्ष कमलाकर मसुरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

लोहार समाजातील लोहारकाम करणाऱ्या उद्योजकांनी २०१४ ला शेती अवजारांची गुणवत्ता वाढविणे, उत्पादकता वाढवून आपली आर्थिक प्रगती साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ओद्योगिक समूह विकास योजनेत सहभाग घेतला. या योजनेत शासनाचे ८० टक्के (४ कोटी २ लाख) तर सभासदांचे २० टक्के (१ कोटी २५ लाख) या प्रमाणे ५ कोटी ५३ लाख रुपये एवढ्या रक्कमेची गुंतवणूक करण्यात आली. साडवली (देवरुख) एमआयडीसी येथे सामुहिक सुविधा केंद्रही उभारले आहे. शासनाने मशिनरी पुरवल्या असून समासदांच्या हिश्शातील जमीनीवर इमारती बांधण्यात आल्या आहेत.

शासनाने पुरवठा केलेल्या मशिनरी पैकी मुख्य घन मशीन ट्रायल घेवून चालू करून दिलेले नाही. त्यामुळे त्यामळे साडवली साडवली येथील संपूर्ण सामुहिक सुविधा केंद्र बंद राहिले आहे. मार्च २०२० ला कार्यान्वित होणे आवश्यक होते. २०२० पासून उद्योग विभागाशी पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर उद्योग मंत्र्यांशीही पाठपुरावा करण्यात आला. तसेच जनता दरबार लोकशाही दिन, लोकप्रतिनिधी मार्फत पाठपुरावा, आमदार यांच्यामार्फत हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न, तरीसुद्धा शासनाने याबाबत दखल घेतली नाही.

या सामुहिक सुविधा केंद्राचे ५० सभासद आहेत. या सभासदांनी घेतलेल्या कर्ज रकमेवर प्रचंड व्याज द्यावे लागत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मुख्य मशीन चालू न केल्याने पूर्ण कंपनी बंद पडल्याने इतर मशिनरी सुद्धा नादुरुस्त अवस्थेत आहेत. वारंवार शासन दरबारी सनदशीर मार्गाने पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला अजून न्याय मिळाला नाही. आम्ही उद्योग विभाग, जिल्हाधिकारी तहसीलदार, आमदार, खासदार यांना निवेदने दिली होती, असे अध्यक्ष मसुरकर यांनी सांगितले.

मागील ९ ऑगस्ट पर्यंत सामुहिक सुविधा केंद्र कार्यान्वित करून दया, अशी मागणी केली होती. न दिल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देऊन सुद्धा शासनाने दखल घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या गंभीर प्रश्नी सरकारचे लक्ष वेधून सरकारने सामुहिक सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण छेडले आहे. त्यांच्या या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनीही पाठींबा दर्शवला आहे.

विश्वकर्मा सामुहिक सुविधा केंद्र अभावी झालेल्या अडचणी

समूह ‘उद्योगाच्या संचालक व सभासदांनी सुमारे १ कोटी २५ लाख रुपये आतापर्यंत खर्च केले आहेत. त्यापैकी ६४ लाख रुपये इतकी रक्कम पतपेढी, बैंक व सावकारी कर्जाने घेतली आहे तर ६१ लाख रुपयांची रक्कम सभासदांनी स्वतःचे दागदागिने गहाण ठेवून व वैयक्तिक कर्ज काढून जमा केली आहे. सामुहिक सुविधा केंद्र चालू नसल्याने उत्पन्न शून्य असून त्यात आतापर्यंत सामुहिक सुविधा केंद्राचे १ कोटी ९० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे कमलाकर मसूरकर यांनी सांगितले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 04-10-2024