नाशिकसह नागपूर, शिर्डी, पुणे, रत्नागिरीत डिफेन्स क्लस्टर : उद्योगमंत्री उदय सामंत

नाशिक : मॅग्नेटिक महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत नाशिकला गुंतवणूक देण्याचा राज्य शासनाचा विचार असून, त्या दृष्टीने बोलणी सुरू आहे. डिसेंबरपर्यंत डिफेन्स किंवा ऑटो इंडस्ट्रीमधून तीन ते आठ हजार कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक नाशिकमध्ये येणार आहे. एका डिफेन्स कंपनीशी याविषयी ८० टक्के चर्चा झाली आहे. राज्यात नागपूर, शिर्डी, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी या ठिकाणी डिफेन्स क्लस्टर उभारले जाणार असल्याने नाशिकमध्ये संरक्षण क्षेत्रातील कंपन्या येण्यास उत्सुक आहे. नाशिकमध्ये पुढील अँकर इंडस्ट्री म्हणून संरक्षण क्षेत्रातील कंपनी असेल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

उद्योग विभागातर्फे सातपूर येथील एका हॉटेलमध्ये आयोजित ‘उद्यमात सकल समृद्धी- महाराष्ट्राची उद्योग भरारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. नाशिकला अपेक्षेपेक्षा मोठा प्रकल्प दिला जाणार असून, संबंधितांशी ८० टक्के बोलणी पूर्ण झाली आहे. डिफेन्स क्लस्टरमध्ये नाशिकचा समावेश असल्याने डिफेन्सचा प्रकल्प येणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

जोपर्यंत शासनाकडून इन्सेंटिव्ह निश्चित केला गेला जात नाही, तोपर्यंत कंपनीकडून होकार दिला जात नसल्यानेच कंपनीच्या नावाची घोषणा करीत नसल्याचेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. जेव्हा गुंतवणुकीबाबतची चर्चा पूर्ण होईल, तेव्हा संबंधित कंपनीच्या संचालकांनाच याबाबतची अधिकृत घोषणा करण्यासाठी नाशिकला पाठविणार असल्याचेही उद्योगमंत्री म्हणाले. तसेच वाहन क्षेत्रातील कंपनी आणण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांना टोला
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचे फेक नॅरेटिव्ह विरोधकांकडून पसरवले जात असून, त्यात तथ्य नाही. याबाबत श्वेतपत्रिका काढली असता, त्यावर विरोधकांनी अवाक्षरही उच्चारले नाही. उलट गेल्या एका महिन्यात महाराष्ट्रात ७५ हजार कोटींची गुंतवणूक आली असून, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचेही सामंत म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 04/Oct/2024