रत्नागिरी : जिल्ह्यात सवाद्य मिरवणुकीने गणरायाचं विसर्जन

रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवारी अनंत चतुर्दशी दिवशी ढोलताशांचा गजर आणि बेंजोच्या निनादात तसेच विसर्जनस्थळी आरत्या करून गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गेल्या १० दिवसांपासून चाललेल्या गणेशोत्सवाची मंगळवारी सांगता झाली. जिल्ह्यात ३७ हजार ८०५ घरगुती तर ६३ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होत असल्याची माहिती पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आली.

जिल्ह्यात गणेशचतुर्थीला पारंपरिक पद्धतीने १ लाख ६६ हजार ८६७ घरगुती, तर ११२ सार्वजनिक मंडळांमार्फत बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यावर्षी सहाव्या दिवशी गौरी-गणपती विसर्जनादिवशी जिल्ह्यातील १ लाख १५ हजार २३४ घरगुती तर १७ सार्वजनिक गणरायांना निरोप देण्यात आला होता. राहिलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन मंगळवारी झाले. त्याकरिता जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना योग्य नियोजनाच्या व दक्षतेच्या सूचना केल्या होत्या.

जिल्ह्यातील पोलीस ठाणेनिहाय मंगळवारी विसर्जन झालेल्या मूर्तींची संख्या अशी – रत्नागिरी शहर १ हजार १२१ खासगी, ७ सार्वजनिक, रत्नागिरी ग्रामीण – ४ हजार ३३७ खासगी, जयगड – ६६३ खासगी, १ सार्वजनिक, संगमेश्वर – ३ हजार ५७६ खासगी, १ सार्वजनिक, राजापूर – ६ हजार १५१ खासगी, २ सार्वजनिक, नाटे – १ हजार ९५५ खासगी, १ सार्वजनिक, लांजा – १ हजार १०५ खासगी व ४ सार्वजनिक, देवरूख – ३ हजार ७९२ खासगी व ३ सार्वजनिक, सावर्डे – ७७८ खासगी व १ सार्वजनिक, चिपळूण – ३ हजार ९६५ खासगी तर १३ सार्वजनिक, गुहागर – ४ हजार ३५० खासगी व १ सार्वजनिक, अलोरे – १०० खासगी व २ सार्वजनिक, खेड – २ हजार ११३ खासगी व १५ सार्वजनिक, दापोली – २ हजार ४२१ खाजगी व ६ सार्वजनिक, मंडणगड ४५ खासगी व ५ सार्वजनिक, बाणकोट – १५३ खासगी, पूर्णगड – १ हजार ४ खासगी, दाभोळ – १७६ खासगी व १ सार्वजनिक. रत्नागिरीचा राजा, श्री रत्नागिरीचा राजा, कारागृह पोलीस तसेच रत्नागिरी शहर पोलिसांच्या गणपतीचे विसर्जन बुधवारी (दि. १८ सप्टेंबर) सायंकाळी केले जाणार आहे. या दिवशी जिल्ह्यात २०६ खासगी आणि ११ सार्वजनिक बाप्पांना निरोप दिला जाणार आहे. एकविसाव्या दिवशी म्हणजे २७ सप्टेंबरला जिल्ह्यात घरगुती १५१ आणि २ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 18-09-2024