BCCI on Shama Mohamed : रोहित शर्माला जाड्या म्हणणाऱ्या काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मदना बीसीसीआयच्या सचिवांनी फटकारलं..

BCCI on Shama Mohamed fat-shames Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करत आहे. टीम इंडियाचे खेळाडू आता सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवण्याची तयारी करत आहेत.

पण दरम्यान, काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी भारतीय कर्णधारावर केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. रोहितच्या तंदुरुस्तीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर शमा मोहम्मद यांनी ते ट्विट डिलीट केले. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी रोहित शर्मावरील शमाच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध केला आहे.

माध्यमांशी बोलताना बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले, आमच्या कर्णधारासाठी (भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा) अशा प्रकारची टिप्पणी एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून करण्यात आली आहे, हे खूप दुर्दैवी आहे. विशेषत: अशा वेळी जेव्हा टीम इंडिया आयसीसी स्पर्धेत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचली असताना, असं वक्तव्य दुर्दैवी आहे.

काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद काय म्हणाल्या होत्या?

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या शानदार विजयानंतर काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेस आणि कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, रोहित शर्मा जाड्या खेळाडू, वजन कमी करण्याची गरज आहे. आणि तो आतापर्यंतचा सर्वात छाप न सोडणारा भारताचा कप्तान आहे.

शमाच्या या विधानामुळे राजकारणही तापले आहे. काँग्रेस नेत्याच्या या विधानावर भाजपने काँग्रेसला घेरले आहे आणि त्यावर जोरदार टीका केली आहे. पण, शमाने तिच्या पोस्टवर स्पष्टीकरण दिले आहे की तिने कोणाचाही अपमान केलेला नाही. फक्त असं म्हटलं जातं की कर्णधार म्हणून रोहितचा फारसा प्रभाव नाही.

रोहित शर्मा यशस्वी कर्णधार

रोहित शर्मा हा एकमेव कर्णधार आहे, ज्याने आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत कधीही ग्रुप-स्टेज सामना हरला नाही. कर्णधार म्हणून रोहित शर्मा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भारताचे नेतृत्व केले आणि 2024 मध्ये त्याने भारताला दुसरे टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिले. आता रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 03-03-2025