रत्नागिरी : नौकेवर कारवाई न झाल्याने मत्स्यव्यवसाय विभागाचे ५ लाखांचे नुकसान

रत्नागिरी : सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या गस्ती पथकाने रत्नागिरी समुद्रात एलईडी दिव्यांची नौका पकडली होती. परंतु, या नौका मालकावर पुढील कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सुमारे ५ लाख रुपयांच्या दंडात्मक रकमेचे नुकसान झाले आहे. नौकेवर कारवाई होऊ नये यासाठी गस्ती पथकातील परवाना अधिकाऱ्यांना कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला, याबाबत मच्छीमारांकडून विचारणा होत आहे.

रत्नागिरीमध्ये नौका मालकांच्या दोन प्रमुख संघटना आहेत. या दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एलईडी प्रकाशातील मासेमारीला कोणतेही समर्थन अथवा सहाय्य मिळणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे अशा कारवाई संदर्भात मदत मागण्यासाठी या दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडे कोणीही जात नाही. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून समुद्रात सुरळीत मासेमारी सुरु होती. त्यानंतर आता शनिवारी रात्री गस्ती पथकाच्या तावडीत सापडलेली एलईडी नौका कोणतीही कारवाई न होता सुटल्याने वातावरण अशांत होवू लागले आहे.

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी एलईडी मासेमारीच्या नौकांना मदतीसाठी घेतल्या जाणाऱ्या एलईडी नौकांवर कारवाई करण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर कस्टम आणि सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाने जोरदार कारवाई करून अनेक एलईडी नौका पकडून दंडात्मक कारवाई केली.

सहाय्यक मत्स्यव्यवाय आयुक्त विभागाच्या पथकाची गस्ती नौकेने रात्री समुद्रात गस्त सुरु असताना महालक्ष्मी नामक एलईडी साहित्य असलेली नौका पकडण्यात आली. या नौका मालकाने सूत्र हलविल्यानंतर गस्ती पथकाच्या महिला अधिकाऱ्याला सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून फोन आल्यानंतर पुढील कारवाई होवू शकली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा वरिष्ठ अधिकारी कोण याचा शोध घेतला जाऊ लागला आहे ही सर्व तडजोड रात्रीच्या वेळी झाल्या लगेचच बोभाटा झाला नाही. मात्र आता हा प्रकार चर्चिला जाऊ लागला आहे. एलईडी साहित्य बाळगणाऱ्या नौका मालकावर ५ लाख रुपये दंडात्मक कारवाईची सागरी मासेमारी अधिनियमानुसार तरतूद आहे. त्यामुळे कचाट्यात सापडलेली नौका कारवाई न करता सुटल्याने मत्स्यव्यवसाय विभागाचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 04/Mar/2025