पावस : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाची आठ घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. या किनाऱ्यावर प्रथमच कांदळवन कक्षाकडून हा प्रयोग करण्यात आला आहे. कासव अंडी घालून गेल्यानंतर सुमारे पंचेचाळीस दिवस झाले असून, लवकरच पिल्ले समुद्राकडे झेप घेतील असा अंदाज आहे.
गेली दोन वर्षे गणेशगुळे किनाऱ्यावर कासवाच्या विणीचा हंगाम सुरू झाल्यामुळे काही प्रमाणात या किनाऱ्यावर अंडी घालण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एक महिना आधी या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी कासवं आली होती.
ही अंडी कांदळवन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली किनाऱ्यावर नेमलेल्या प्राणीमित्रांनी हॅचरी करून संरक्षित केली आहेत. या घरट्यांमधील सुमारे ९०० अंडी संरक्षित झाली. आज नव्याने सहा कासवांनी किनाऱ्यावर अंडी घातली आहेत. त्यामधील आठशे अंडी संरक्षित केली आहेत. गणेशगुळे किनारा शांत असल्यामुळे येथे कासवं अंडी घालण्यासाठी येतात तसेच त्यांची सुरक्षा करणेही सोपे जात असून, भविष्यात या किनाऱ्यावर कासव महोत्सवाचेही आयोजन करता येऊ शकेल. या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळू शकते.
कासवांची अंडी संरक्षित करण्यासाठी यंदा प्रथमच गणेशगुळे किनाऱ्याची निवड केली गेली आहे. तिथे चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. लवकरच अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडतील- किरण ठाकूर, कांदळवन कक्ष
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 04/Mar/2025














