जनतेला सुखी ठेवा; खुर्चीप्रमाणे फिरवू नये : पालकमंत्री उदय सामंत

चिपळूण : नवीन इमारतीच्या माध्यमातून सुखसोयी होत आहेत. त्या इमारतीमधून जनतेला सुखी ठेवण्यासाठी कार्यरत असायला हवे, याचे भान ठेवून जनतेला खुर्चीप्रमाणे फिरवू नये, अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे प्रांताधिकारी कार्यालयाच्या नव्या इमप्प्रतीच्या बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केली.

चिपळूण उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. याप्रसंगी आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, माजी आमदार सदानंद चव्हाण, तहसीलदार प्रवीण लोकरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, नवीन इमारतीतून गोल खुर्चीप्रमाणे लोकांना फिरवू नये. जनतेच्या हिताची कामे व्हायला हवीत, जिल्ह्यामध्ये प्रशासन सर्वसामान्यांची कामे करत आहे. नव्या इमारतीमधूनही अशाच प्रकारे सर्वसामान्यांची कामे मार्गी लागावीत.

देखणी इमारत उभी करा…
देशाच्या प्रगतीत महसूल विभागाचा मोठा वाटा आणि योगदान आहे. प्रांत कार्यालयाची इमारत होणे, यासाठी सर्वांनी पाठिंबा दिला. देखणी इमारत उभी करा, असे आमदार जाधव यांनी सांगितले. यावेळी आ. शेखर निकम यांनीदेखील, या इमारतीतून जनतेची कामे केली जातील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी विविध पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 04/Oct/2024