खेड : तालुक्यात यंदा मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. सलग दोनवेळा जगबुडीच्या पुराचे पाणी बाजारपेठेत घुसले. ६ ते ७ वेळा पूरसदृशस्थितीही निर्माण झाली होती. चारच दिवसांपूर्वी परतीच्या पावसानेही दाणादाण उडवत मटणमच्छी मार्केटपर्यंत पाणी घुसले होते. आतापर्यंत तालुक्यात ४४१७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊनही सद्यःस्थिती भरणेतील जगबुडी नदीपात्रातील पाणीपातळी घटली आहे. यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे.
बारमाही वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्राने आजवर नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. यंदा जगबुडी नदीपात्रातील काहीअंशी गाळ उपसण्यात आल्याने पुराचा धोका टळेल, अशी अटकळ बांधण्यात आली होती. मात्र, मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे बाजारपेठेत दोनवेळा पुराचे पाणी घुसून व्यापाऱ्यांची हानी झाली. नदीकाठच्या रहिवाशांच्या घरांमध्येही पाणी घुसले. नारिंगी नदीही जलमय होऊन खेड, दापोली, मंडणगड व खाडीपट्ट्यातील वाहतूक ठप्प झाली होती. नारिंगी सभोवतालची भातशेती ही पुराच्या पाण्यात राहिल्याने नासाडी झाली. मुसळधार पर्जन्यवृष्टीनंतरही येथील जगबुडी नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. पातळी कमी झाल्याने झाडेझुडपे दृष्टीस पडत आहेत. पाणीसाठ्यात घट झाल्याने पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्टेंबर अखेरीसपर्यंत पडलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावले असले तरी जगबुडी नदीपात्रात आतापासून पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला असून पाणीटंचाईचे संकट उभे राहू शकते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 04/Oct/2024