चिपळूण शहरातील घरांची खरेदी- विक्री मंदावली?

चिपळूण : शहरातील घरांची विक्री कमी झाली आहे. बांधकाम चालू असलेल्या इमारतींमध्ये शेकडो घरे शिल्लक आहेत. रेडलाईन आणि ब्ल्यूलाईनमुळे पन्नास टक्क्यांहून अधिक नवीन प्रकल्प सुरू झाले नाहीत. चिपळूण शहरात पुराचे पाणी भरते, या कारणामुळे शहरात घर खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे, असा निष्कर्ष येथील बांधकाम व्यावसायिकांनी काढला आहे.

कोकणातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चिपळूण शहरात मुबलक पाणी, शाळा, रुग्णालय, एसटी, रेल्वेसह इतर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरात राहणारे लोक गावाकडे घर असावे म्हणून चिपळूणला प्राधान्य देत होते. ग्रामीण भागातील ग्रामस्थांचेही चिपळूण शहरात स्थलांतर झाले आहे त्याशिवाय गुहागर, दापोली, संगमेश्वर आणि खेड तालुक्यातील अनेक कुटुंबे चिपळूणमध्ये विकत घर घेऊन राहत आहेत, २०२१ मध्ये शहरात महापूर आला. सुमारे पंधराशे कोटींचे नुकसान झाले. त्याचबरोबर महापुराचे शहर म्हणून चिपळूणची राज्यभर बदनामी झाली, त्याचा परिणाम आता बांधकाम व्यवसायावर झाला आहे.

याबाबत माहिती देताना येथील बांधकाम व्यावसायिक संतोष तडसरे म्हणाले, शहरात २०२१ मध्येच पाणी भरले, असे नाही. मुसळधार पाऊस झाल्यानंर शहरात पूर येतो, हे नित्याचेच आहे. २०२१ मध्ये मात्र हानी जास्त झाली. त्यानंतर प्रशासनाकडून त्यावर उपायोजना सुरू आहेत, मात्र चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींची चर्चा जास्त होते.

नाईक कंपनीच्या परिसरात वाशिष्ठी नदीवर बांधलेल्या पुलाचे डिझाईन पूर्णपणे चुकीचे आहे. हा पूल इशारा आणि धोका पाठच्या खाली आहे. त्याचे दोन्ही अँबेटमेंट नदीपात्रात आहेत; मात्र गुसळधार पाऊस झाल्यानंतर या पुलाच्या परिसरात किती पाणी आहे त्याचा अंदाज घेऊन शहराला जागरुक केले जाते. कोयनेचे पाणी वाशिष्ठी नदीत सोडण्याबाबतचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे गेल्या वर्षी प्रचंड पाऊस पडूनही शहरात पाणी भरले नाही. याचा विचार व्हायला हवा रेडलाईन आणि ब्ल्यूलाईन म्हणजे हाताला दुखापत झाली म्हणून पूर्ण हातच तोडून टाकायचे, असा प्रकार आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधता येत नाही आणि घरे घ्यायची आहेत त्यांना घरेही घेता येत नाहीत.

३५ टक्के घरे शिल्लक
चिपळूण क्रिडाईमध्ये एकूण ५० नोंदणीकृत बांधकाम व्यावसायिक आहेत. यातील १४ लोकांचे प्रकल्प सुरू आहेत. उर्वरित व्यावसायिकांना रेडलाईन आणि ब्ल्युलाईनमुळे परवानगी मिळत नाही त्यामुळे त्यांचे प्रकल्प बंद आहेत. काहींचे अर्धवट आहेत, ज्यांचे प्रकल्प चालू आहेत यातील ३५ टक्के घरे शिल्लक आहेत. त्यांची विक्री होत नाही. घर घेणारे चिपळूण शहर सोडून उपनगरात घर घेण्यास पसंती देत आहेत. शहरात २ हजार ते २२०० रुपये प्रती स्क्वे. फूट वर देऊनही ग्राहक येत नाहीत, उपनगरात हाच दर ३ हजार ते ३५०० हजारांपर्यंत आहे.

चिपळूण शहरावर लादलेली रेडलाईन आणि ब्ल्यूलाईन उठवणे, शहराला महापुरातून मुक्त करणे, शहर विकासाचे नियोजन करणे यासाठी पॉलिसी तयार व्हाया हवी. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन याबाबत पुढाकार येण्याची गरज आहे. –संतोष तडसरे. अध्यक्ष, किडाई, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 04/Mar/2025