‘भंडारी प्रीमियर लीग’ च्या दुसऱ्या पर्वात रिळचा वीर भराडीन संघ ठरला महाविजेता

◼️ जयगडचा राजा संघाला उपविजेतेपद : उत्साह आणि जल्लोषात रंगला स्पर्धेचा थरार!

रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथील कै. डॉ. नानासाहेब मयेकर क्रीडांगणावर चार दिवसीय कालावधीत रंगलेल्या भंडारी प्रीमियर लीग स्पर्धेच्या थरारात रीळचा वीर भराडीन संघ महाविजेता ठरला तर जयगडचा राजा संघाने उपविजेतेपद प्राप्त केले.

या भंडारी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये एकूण १२ संघानी सहभाग घेतला होता. त्यामध्ये गुहागर आणि रत्नागिरी तालुका मर्यादित संघांमध्ये गुहागर मधील ३ आणि रत्नागिरी मधील ९ संघ मालकांनी संघ खरेदी करून सहभाग नोंदवला होता. यावेळी प्रचंड उत्साह आणि जल्लोषात या स्पर्धेचा थरार रंगला .तसेच या स्पर्धेचे प्रक्षेपण एकूण चार दिवस यू ट्यूब चॅनेलवर लाईव्ह स्वरूपात दाखविण्यात आल्याने अनेक ठिकाणच्या क्रिकेटप्रेमींनी घरबसल्या या स्पर्धेचा आनंद लुटला. यावेळी या माध्यमातून स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

या दुसऱ्या पर्वातील स्पर्धेमध्ये रीळ येथील संकेत तुषार चव्हाण यांच्या लेकीचा महाविजेता ठरलेल्या वीर भराडीन संघाला रोख रुपये ५१ हजार रुपयांचे पारितोषिक व भव्य दिव्य स्वरूपाचा आकर्षक चषक तर जयगड संदखोल येथील विवेकदादा सुर्वे यांच्या मालकीच्या जयगडचा राजा संघाला रोख रुपये ३५ हजार व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर वरवडे येथील क्रांती क्रिडा मंडळाचा क्रांती ११ संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. या संघाला रोख रुपये २५ हजार व आकर्षक चषक तर वरवडे येथील प्रथमेश पारकर यांचा प्रथमेश वॉटर स्पोर्टस् संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. या संघाला रोख रुपये ११ हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच या स्पर्धेमध्ये खास प्रेक्षणीय सामना गुहागर विरुद्ध रत्नागिरी संघांमध्ये घेण्यात आला त्यामध्ये रत्नागिरी लायन्स हा संघ विजयी झाला या संघाला देखील रोख रकमेचे पारितोषिक व आकर्षक देऊन सन्मानित करण्यात आले. त्याशिवाय या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यातील सामनावीर ठरलेल्या खेळाडूंना आकर्षक बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून क्रांती वरवडे संघाचा सोहम भाटकर, नवोदित खेळाडू म्हणून बोऱ्या गुहागर येथील चंद्रभागा फायटरस संघाचा खेळाडू दीप मोरे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून वीर भराडीन रीळ संघाचा खेळाडू तेजस पडवळ तर संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, चौकार षटकारांचा बादशहा आणि मालिकावीर म्हणून ठरलेल्या सुदर्शन मयेकर या सर्व खेळाडूंना आकर्षक बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी भंडारी समाजाच्या अनेक प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी युवा नेते श्री. विवेक सुर्वे, भंडारी समाज अध्यक्ष श्री. राजीव कीर, मालगुंड सरपंच सौ. श्वेता खेऊर, काळबादेवी सरपंच सौ.पाटील, नांदीवडे सरपंच सौ.आर्या गडदे, श्री. संदीप कदम, अक्षय सुर्वे, भूषण मयेकर, उदय पाटील, रोहित मयेकर, अशोक खेऊर, बाळा चव्हाण, बबलू विचारे,सन्मान मयेकर असे अनेक समाज बांधव आणि सहकारी उपस्थित होते. तसेच या स्पर्धेसाठी गुहागर तालुका तालुक्यामधून भंडारी समाजाच्या प्रतिष्ठित मान्यवरांमध्ये श्री. निलेश सुर्वे, बाळू बागकर, श्रमिक भाटकर सोबत अनेक समाज बांधवांनी भेट देऊन समाजातील खेळाडूंचा खेळ उंचवण्यासाठी विशेष प्रोत्साहित केले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धेचे यजमान मालगुंड, भंडारपुळे, राजवाडी येथील सर्व समाज बांधव यांनी विशेष मेहनत घेतली. त्यामुळे संपूर्ण परिसरातून यजमान गावांचे कौतुक करण्यात आले आहे. या सांगता झालेल्या स्पर्धेपेक्षा पुढील काळात सुद्धा अनेक पर्व उत्तम नियोजन करून स्पर्धा यशस्वी करण्याचा निर्धार स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री. निखिल बोरकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:03 04-03-2025