रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर, वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शिवजयंतीनिमित्त आजीवन अध्ययन व विस्तार विभागाअंतर्गत तीन दिवसीय शिवसोहळा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचावेत, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने शिवसोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात कथाकथन, प्रश्नमंजुषा व व्हिडिओ मेकिंग स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कथाकथन स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. वैभव कीर, प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी इतिहास विभागप्रमुख प्रा. मंदार बेटकर व व्हिडिओ मेकिंगसाठी उपप्रचार्या प्रा. वसुंधरा जाधव परीक्षण केले.
या स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. कथाकथन स्पर्धेत गौरवी ओळकर, दर्शन शिंदे व पलक वाघेला, सानिका खर्डे यांनी पहिले तीन क्रमांक पटकवले. प्रश्नमंजूषा स्पर्धेत समृद्धी बोरकर, गौरवी ओळकर व डॉली आलीम, नेहा गोसावी व सानिका खर्डे यांनी पहिले तीन क्रमांक मिळविले. व्हिडिओ मेकिंगमध्ये रावसाहेब होसूर व संजोग भातडे, सोनिया शुक्ला व पारस गुळेकर यांनी गुणानुक्रमे यश संपादन केले.
बक्षीस वितरण समारंभ महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य मधुरा पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला उपप्राचार्या वसुंधरा जाधव, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. राखी साळगावकर, आजीवन अध्ययन व विस्तार विभागप्रमुख प्रा. आसावरी मयेकर उपस्थित होत्या. अनुष्का नागवेकर हिने आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:20 04-03-2025














