गुहागर : ‘आरजीपीपीएल’ देणार थकीत करातील २५ टक्के रक्कम

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल, वेलदूर, रानवी या ग्रामपंचायतींच्या थकीत कराबाबत जिल्हा परिषदेने बाजूने निकाल देऊनही कर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आरजीपीपीएलने आता सात दिवसांत करातील २५ टक्के रक्कम देण्याची कबुली दिली आहे. आ. भास्कर जाधव यांनी कराबाबतची बैठक बोलावून कंपनी अधिकाऱ्यांना दणका दिला.

अंजनवेल, वेलदूर, रानवी या ग्रामपंचायतीचा सन २०२१-२०२२ व सन २०२२ २०२३ या दोन वर्षाचा कर आरजीपीपीएल कंपनीने थकवीला आहे. आमची सरकारी कंपनी आहे. आम्ही कर एमआयडीसीला देऊ असे म्हणत येथील तीनही ग्रामपंचायतीला कर देण्यास नकार देणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना अखेर निकालाप्रमाणे कराबाबत आ. भास्कर जाधव यांच्या दणक्यामुळे सकारात्मक निर्णय घेण्याची वेळ आली आहे. या थकीत कराविषय संदर्भात अंजनवेल ग्रामपंचायतीच्या सभागृहात तीनही ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रमुख ग्रामस्थांसमवेत आ. भास्कर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी आरजीपीपीएलच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावली होती.

या बैठकीतून ३ एप्रिल २०२४ रोजी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या बाजूने निर्णय देऊनही आरजीपीपील कंपनी कर देण्यास दिरंगाई करत असून कंपनीने तत्काळ कराची रक्कम द्यावी, असे आ. जाधव यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर सांगितले.

यावेळी कंपनीचे एचआर असिस्टंट जनरल मॅनेजर स्नेहाशीश भट्टाचार्य यांनी कंपनी जिल्हा परिषदेच्या निकालाविरोधात हायकोर्टामध्ये गेल्याचे सांगितले. तर एचआर ज्युनिअर मॅनेजर आशिष पांडे यांनी मागील कराबाबत आपली सहकारी कंपनी कोकण एलएनजीने त्यांच्या हिश्श्यातील कराची रक्कम आम्हाला दिलेली नाही.

यामुळे कर देता येत नसल्याचे सांगत या बैठकीतूनही टोलवाटोलवी सुरू केली होती. यावर आ. जाधव यांनी हायकोर्टात गेल्याचा पुरावा दाखवा सांगितल्यावर स्नेहाशीश भट्टाचार्य या अधिकाऱ्याची भंबेरी उडाली. तरीही २८ एप्रिल रोजी रीट पीटीशन दाखल केल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आ. जाधव यांनी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

यावेळी माजी सरपंच यशवंत बाईत यांनी कंपनीच्या या ढोंगीपणाचा पर्दाफाश करुन कंपनी दिशाभूल करत असल्याचे सांगितले. त्यांनी कोकण आयुक्तांकडे जाणे आवश्यक असताना ते हायकोर्टात गेल्याचे बोगस सांगत आहेत. तसेच आशिष पांडे हे कोकण एलएनजीचा विषय मध्येच काढून दिशाभूल करीत आहेत असे सांगून निकालाप्रमाणे दोन वर्षाचा कर कंपनीने दिलाच पाहिजे असे ठामपणे सांगितले. अखेर आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोषकुमार तकेले यांना फोन लाऊन तुम्ही कराची रक्कम केव्हा देता? अन्यथा बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना सोडत नाही, असे म्हणत आ. जाधव यांनी कराचा विषय लावून धरला. सुरुवातीला एक महिन्याचा कालावधी कंपनीकडून मागण्यात आला, परंतु, शेवटी सात दिवसांत तीनही ग्रामपंचायतीच्या त्यांच्या एकूण थकीत कराच्या २५ टक्के रक्कम द्यावी व तशा प्रकारची कबुली कंपनीचे सीईओ संतोषकुमार तकेले यांनी मान्य केले. जर तुम्ही कोर्टात गेलात आणि त्यातून तुमच्या बाजूने निकाल लागला तर ती रक्कम परत केली जाईल, असेही अंतर्गत लिखाण करू शकता, असे यावेळी ठरविण्यात आले.

या बैठकीला तीनही ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, विस्तार अधिकारी शरद भांड, एमआयडीसी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 04/Oct/2024