रत्नागिरी : केंद्र व राज्य शासनाने ग्रामपंचायतीकडे सोपवलेल्या सर्व योजनांची त्यांच्या उद्दिष्टाप्रमाणे अंमलबजावणी होत आहे. विशिष्ट योजनांसाठी देण्यात आलेले अनुदान त्याच योजनांवर योग्य रीतीने खर्च केले जात आहे, हे पाहण्याची जबाबदारी सरपंचांची राहणार आहे. तसेच पंचायत कार्यालय ब कामकाजावर नियंत्रणाबरोबर गावात सुरू असलेल्या विकासकामांच्या दर्जावर लक्ष राहणार आहे.
शासनाच्या ग्रामविकास विभागाने सरपंचांची काय कर्तव्ये आहेत, याबाबतचा आदेश सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना काढला आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रथम नागरिक या नात्याने ग्रामपंचायत निधीत जमा झालेल्या सर्व रकमांचे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहील. ग्रामपंचायतीचे व्यवस्थापन व विकास साध्य करता यावा म्हणून सरपंच, ग्रामपंचायत निधीचे संरक्षण आणि संवर्धन व निधीचा दुरुपयोग, हानी अपव्यय होणार नाही, याची पंचायतीचा सदस्य या नात्याने तो अधिनियमातील कलम १७८ ला अधिन राहून दक्षता घेईल. तो पंचायत कार्यालयाच्या व पंचायतीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवील. पंचायतीकडे असणाऱ्या सर्व निधीमधून होणाऱ्या आर्थिक व्यवहारासाठी सचिव व सरपंच हे संयुक्तपणे जबाबदार राहतील. ग्रामपंचायतीचे सर्व लेखे योग्य रितीने तयार करून घेऊन ते ग्रामपंचायतीला सादर करण्याची जबाबदारी सरपंचांची राहील.
सर्व कर व फी आकारणी अधिनियमानुसार मान्य दराने करण्यात आली आहे. कोणतीही आर्थिक हानी झालेली नाही, याची खात्री करून घेण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी सरपंचांची राहील. ग्रामपंचायतीच्या सर्व मालकीच्या मालमत्तेची नोंदवहीमध्ये योग्य नोंद ठेवून तिथे योग्यरीत्या संरक्षण व परीक्षण करणे.
पंचायतीकडे असलेल्या ग्रामनिधीचा कोषाध्यक्ष या नात्याने अशा निधीतून होणारा प्रत्येक खर्च रास्त, वाजवी व अत्यावश्यक असेल तेव्हाच केला जाईल, हे सरपंच पाहणार आहेत.
विकासकामांना भेटी
गावोगावी ग्रामपंचायतीमार्फत केल्या जाणाऱ्या सर्व कामांच्या प्रत्यक्ष ठिकाणांना सरपंच वेळोवेळी भेटी देतील. त्याचबरोबर कामाच्या प्रगतीवर व दर्जावर लक्ष ठेवावे लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:21 PM 05/Mar/2025














