कोयना वीज प्रकल्पाच्या पोफळीतील सर्जवेलची गळती वाढली

चिपळूण : कोयना वीज प्रकल्पाच्या उलोळ विहीर किंवा पोफळीतील सर्जवेलला गळती लागली असून पोफळीच्या पूर्वेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये धबधब्यासारखा पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गळतीमुळे हा प्रकार घडत आहे. येथील दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

कोयना धरण पूर्व दिशेला आहे, तर पश्चिमेला कोयना वीज प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी उभारलेल्या टॉवरमधून आधीजल भुयार किंवा हेड रेस टनेल निघते. त्या बोगद्याच्या शेवटी एक विहीर किंवा सर्जवेल बांधलेली आहे. या विहिरीपासून पुढे बोगद्यातून पाणी पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या वीजगृहाकडे जाते. ही सर्जवेल १९६० मध्ये बांधून पूर्ण झाली असून ती सह्याद्रीच्या कातळात १०० मीटर खोल खोदलेली आहे.

या विहिरीला अर्ध्या मीटर रुंदीचे काँकिट अस्तरीकरण आहे. या विहिरीने अनेक भूकंपाचे धक्के पचवले आहेत. मात्र काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे सर्जवेलमधून हे झिरपलेले पाणी इमर्जन्सी टनेल (ईव्हीटी) किंवा आपत्कालीन झडपाद्वारे भुयारामध्ये जाते आणि तेथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडत आहे. यामध्ये घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती नसल्याचे तेथील सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 05/Mar/2025