रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीमध्ये सुरू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालय त्याला जोडण्यात आल्यामुळे, रुग्णालयाच्या कारभारात मोठी सुधारणा झाली आहे, असे सांगत डॉक्टरांची संख्याही वाढली असून, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमधून समाधान व्यक्त होत आहे. नियमित व अवघड शस्त्रक्रियाही यशस्वीपणे होत असल्याने शस्त्रक्रियांची संख्याही वाढली असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
डॉक्टरांच्या कमी संख्येबाबत अनेक वर्ष चर्चा सुरु होती. या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यावर हा प्रश्न सुटू शकतो हे लक्षात आल्यावर राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता आणून याठिकाणी महाविद्यालय सुरु केले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय या महाविद्यालयाकडे वर्ग करण्यात आले. त्यामुळे या रुग्णालयाचा कारभार महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या हाती सोपवण्यात आला आहे. मागील दोन वर्ष डॉ. जयप्रकाश रामानंद हे अधिष्ठाता म्हणून महाविद्यालय व रुग्णालयाची धुरा समर्थपणे सांभाळत आहे.
वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील कामकाजावर प्रकाशझोत टाकला. वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांची संख्या वाढल्यामुळे त्याचा उपयोग सामान्य रुग्णालयातील रुग्णांनाही होत आहे. यंदा दुसरी बेंच शिक्षण घेत असून, रत्नागिरीत आता २०० विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.
पहिल्या बॅचचे एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे हे वैद्यकीय शास्त्राचे विद्यार्थी रुग्णालयात येणारे रुग्ण यांची तपासणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत असल्यामुळे रुग्णांनाही सेवा मिळत आहे. प्रसुती शस्त्रक्रिया, हाडाच्या, डोळ्यांसह विविध शस्त्रक्रियांची संख्याही मोठ्याप्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातील रुग्ण विश्वासाने जिल्हा रुग्णालयात येत असून अनेक अवघड शस्त्रक्रियाही याठिकाणी होत असल्याचे डॉ. रामानंद यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जिल्हा सामान्य रुग्णालय जोडले गेल्यामुळे अनेक नवीन सुविधा रुग्णालयात निर्माण झाल्या आहेत. बालकांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले कक्ष निर्माण करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 06/Mar/2025













