रत्नागिरी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या छाननीमध्ये अनेक महिलांनी निकषांचे उल्लंघन करून लाभ घेतल्याचे पुढे आले आहे. चारचाकी असलेल्या १ हजार २०० महिला, वार्षिक उत्पन्न जास्त असलेल्या २ हजार, संजय गांधी निराधार योजना, ६५ वर्षांवरील काही महिला, शेतकरी सन्मान योजना यांचा लाभ घेणाऱ्या सुमारे ५ ते ७ हजार, अशा आतापर्यंत १० हजार महिलांवर योजनेतून अपात्र होण्याची टांगती तलवार आहे. राज्यस्तरावरून आलेल्या अपात्र यादीच्या छाननीनंतर हे स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महायुती शासनाने विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. पा योजनेमध्ये अनेक निकष होते; परंतु विधानसभा निवडणुकीत निकषांचा जास्त विचार न करता अर्ज करणाऱ्या बहुतांश महिलांना योजनेमध्ये सामावून घेतले. महिन्याला दीड हजार रुपये बहिणीच्या खात्यात जमा होऊ लागले.
या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा बोजा पडला आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेची बारकाईने छाननी सुरू झाली. घरात चारचाकी असणे, वार्षिक उत्पन्न अडीच लाखावर असणे, संजय गांधी निराधार योजना, शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या, ६५ वर्षांवरील काही महिला आदी निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे.
या निर्णयामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी आहे; परंतु शासनाने राज्यस्तरावरूनच अपात्र यादी जाहीर केली आहे. त्या यादीची जिल्हास्तरावर छाननी होऊन आतापर्यंत सुमारे १० हजार महिला निकषात न बसल्याने अपात्र होणार आहेत. राज्यस्तरावरून अपात्र याद्या प्राप्त होणार आहेत.
राज्यस्तरावरून अपात्र याद्या प्राप्त होणार आहेत. चारचाकी वाहने असतील तर राज्यस्तरावर आलेल्या यादीची आरटीओंकडून खात्री करून घेणार. संजय गांधी किंवा अन्य योजनेची यादी आली तर तहसीलदारांकडून खात्री करून घेणार आहे. महिनाभरात किती महिला अपात्र ठरल्या ते स्पष्ट होईल- श्रीकांत हावळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 06/Mar/2025














