रत्नागिरी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे राज्यस्तरीय विवेकरेषा व्यंगचित्र स्पर्धा

रत्नागिरी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्यस्तरीय ‘विवेकरेषा व्यंगचित्र स्पर्धा’ आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन गटात होईल. लहान गटाचा वयोगट १० ते १६ वर्षे, तर खुला गट १६ वर्षांवरील सर्वांना खुला आहे.

सर्व गटातील स्पर्धकांना व्यंगचित्राकरिता भुताटकीचा खोटेपणा, बुवाबाजी – एक फसवणूक, अंधश्रद्धा आणि विज्ञान, विवेकी विचार हे चार विषय आहेत. दोन्ही वयोगटांकरिता अनुक्रमे ३,०००, २,०००, आणि १,००० रुपये अशी पारितोषिके दिली जातील. व्यंगचित्र मराठीत असावे. रंगीत अथवा कृष्णधवल चालेल. प्रत्येक स्पर्धक २ व्यंगचित्रे पाठवू शकतो. कोणत्याही दोन विषयांवरील चित्रे चालतील. चित्रे artistunitedindia@gmail.com येथे मेल करावीत. व्यंगचित्रे पाठवण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आहे. निकाल ३१ मार्च २०२५ रोजी जाहीर होईल. अंनिसच्या वतीने ‘विवेकरेषा’ नावाचे एक भारतातील प्रतिभावंत व्यंगचित्रकारांचे प्रदर्शन होणार आहे. त्या प्रदर्शनामध्ये स्पर्धेतील निवडक चित्रे लावली जातील. व्यंगचित्रकारांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या कुंचल्याने विवेकाचा विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद रुजवण्यात चित्रकारांचा सहभाग महत्त्वाचा आहे. तेव्हा या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त चित्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या स्पर्धेचे संयोजक व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव, अंनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर, राहुल थोरात, मिलिंद देशमुख यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:27 06-03-2025