‘लाडकी बहीण’च्या पुढील नऊ हप्त्यांची तरतूद : उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : ‘लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जमा झाला आहे. आता पुढच्या हप्त्यांची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्र हप्ते येणार आहेत. मात्र त्याबरोबरच पुढच्या नऊ महिन्यांसाठी ३५ हजार कोटींची तरतूद करून ठेवली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना पुढचे नऊ हप्ते मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री पवार गुरुवारी (ता. ३) बारामतीच्या दौऱ्यावर होते. या वेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. बारामती येथील बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी आपल्यातील बदल अधोरेखित केला. ते म्हणाले, की या पुढील काळात मी कोणावरही टीका करत नाही, कार्यकर्त्यांनीही टीका करण्याच्या भानगडीत पडू नये, आपण केलेली विकासकामे मोठी आहेत, त्यामुळे ती कामेच आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊ, मी आता तुम्हाला हसताना दिसतोय ना, अजित पवार आता विनम्र झालेले आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनीही आता बदल करायला हवा असे त्यांनी सांगितले. दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरपर्यंत खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत. असे अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी सांगितले. होते. त्यानंतर आज पुढील नऊ महिन्यांच्या पैशांची तरतूद केली असल्याचे सांगितले.

झारगडवाडीच्या बाजारासाठी विनामूल्य जागा
“बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झारगडवाडी येथील प्रस्तावित जनावरे बाजाराच्या २१ एकर जागेसाठी आठ कोटींची मागणी केली होती, मात्र कॅबिनेटमध्ये चर्चा करून ही जागा विनामूल्य बाजार समितीला मिळवून दिली आहे.” असेही पवार या वेळी म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 04/Oct/2024