कणकवली : कुडाळ-मालवणचे आ. नीलेश राणे यांनी विधिमंडळ अधिवेशनात मुंबई-गोवा महामार्ग नक्की कधी पूर्ण होणार? असा सवाल सरकारला केला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे २०१८ साली जेव्हा कोकणात आले, त्यावेळी रत्नागिरीमध्ये त्यांनी मुंबई-गोवा महामार्गासाठी साडेअठरा हजार कोटींची तरतूद केल्याचे सांगितले होते. आपल्याला सरकारला विचारायचे आहे की, या साडेअठरा हजार कोटीपैकी मुंबई-गोवा महामार्गावर नेमका किती खर्च झाला? असा सवाल त्यांनी केला.
आ. राणे म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गावर आतापर्यंत नेमका किती खर्च झाला, हे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला कळायला हवं, लोक आमच्या अंगावर यायला लागले आहेत. महामार्गाचे काम सुरू करून अनेक वर्षे लोटली आहेत. मात्र, अद्याप तो पूर्ण झालेला नाही. काही महिन्यांनी गणेश चाकरमान्यांना चतुर्थी येईल, आम्ही काय उत्तर द्यायचं? राज्यपालांच्या अभिभाषणातही राज्यातील रस्ते दर्जेदार करण्याचे आश्वासन दिले आहे.
कोकणात सरासरी ४ हजार मि.मी. पाऊस पडतो. जिथे तीन इंच पाऊस पडतो, तिथेही ग्रेड तोच वापरायचा आणि जिथे ४ हजार मि.मी. पाऊस पडतो तिथेही तोच ग्रेड वापरायचा, मग क्वालिटी कशी मिळणार? सार्वजनिक बांधकाम विभागात १८ हजार कोटीची बिले अजून दिली गेलेली नाहीत. तिच बिले दिली गेली नाहीत तर नवीन रस्ते कसे करणार? रस्त्यांची दुरुस्ती कशी करणार आहोत? याचे उत्तर सरकारने द्यावे. आमच्याकडे ४ हजार मि.मी. सरासरी पाऊस पडतो, तेथे रस्ते दुरुस्तीसाठी पैसा मिळत नाही. एक काळ असा होता २०१४ पूर्वी रस्ते दुरुस्तीसाठी पैसे मिळत होते, आता कोकणाला रस्ते दुरुस्तीसाठी एक कवडीही मिळत नाही. काँक्रिटचे रस्ते जेव्हा होतील, तेव्हा होतील तुर्तास रस्ते दुरुस्तीसाठी तरी कोकणाला पैसे मिळणार का? असा सवाल आ. निलेश राणे यांनी केला.
हे आम्हाला कधीतरी सरकारने सांगावे….
मुंबई-गोवा महामार्गापैकी सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील रस्ता चौपदरीकरण पूर्ण झाला आहे. पण रत्नागिरीचा १००-१५० कि.मी.चा पॅच का पूर्ण होत नाही? हे आम्हाला कधीतरी सरकारने सांगणे गरजेचे आहे, असेही श्री. राणेंनी बोलून दाखवले.
आ. राणे म्हणाले…
मुंबई-गोवा महामार्गावर किती खर्च झाला ?
रत्नागिरीचा १५० कि.मी.चा पॅच अपूर्ण का
कोकण रस्ते दुरुस्तीसाठी कवडीही मिळत नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 07/Mar/2025














