Shimgotsav : कोकणात संकासुर आणि गोमुच्या नाचाचे आकर्षण !

रत्नागिरी : कोकणात शिमगोत्सवाला पहिल्या होळीपासून सुरुवात झाली आहे. अतिशय उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या सणात येथील संकासुर आणि गोमुचा नाच सर्वांसाठी आकर्षण ठरत आहे. कोकणी खेळे म्हणून शिमगोत्सवात एक वेगळे आकर्षण आणि ओळख सर्वदर आहे.

कोकणात पहिल्या होळीपासून मोठ्या उत्साहात शिमगोत्सव सुरू होतो. होम लागल्यानंतर प्रत्येक ग्रामदैवतांच्या पालख्या वाडीवस्तीवर फिरत असतात. यावेळी नोकरीनिमित्त बाहेर असणारे शहरवासीय आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी आवर्जून गावी येतात. त्यामुळे गावागावांत जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. यात मुख्य म्हणजे पहिल्या होळीनंतर म्हणजेच दुसऱ्या होळीला अनेक गावांतील ग्रामदेवतेचे खेळे गावभोवनीसाठी इतर गावागावांत आपल्या ग्रामदेवतेचा गजर करत पायी अनवाणी फिरतात. संपूर्ण १० ते ११ दिवस अनवाणी पायाने आपल्या ग्रामदेवतेचा गजर करत फिरणारे हे खेळे म्हणजे लहान थोरांसाठी एक कुतुहलच असते.

यावेळी घरोघरी होणारा संकासूर व गोमुचा नाच सर्वांसाठीच आकर्षण ठरत असते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत येथील संकासुराचे असलेले कौतुक नक्कीच पाहण्यासारखे असते. कोकणातील संकासूराची क्रेझ आजही सर्वत्र आहे. मुख्य म्हणजे यामध्ये असणारा संकासुर त्याला लहान-मोठ्यांकडून ‘हू’ म्हणून त्याला पाठलाग करण्यास लावले जाते. हेदेखील पाहणे ओत्सुक्याचे व कौतुकास्पद असते. कोकणात येणारे पर्यटकही हा गोमू आणि संकासुराचा नाच पाहण्यासाठी आतुरलेले पाहावयास मिळतात. एकूणच कोकणची ही संस्कृती आजही विज्ञानाच्या युगात जपून आहे हे विशेष.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:46 PM 07/Mar/2025