महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी शरद पवारांमुळे हरवली; पडळकरांची बोचरी टीका

मुंबई – शरद पवारांच्या अर्ध्या विधानाशी मी सहमत आहे. महाराष्ट्राचा चेहरा सुधारण्याची आणि बदलण्याची आवश्यकता होती ती देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केली. शरद पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय.

५०-६० वर्ष महाराष्ट्राची सत्ता शरद पवारांच्या हाती होती तेव्हा त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्राला आणि हिंदुस्तानाला जी तेजाची झळाळी दिली होती ती शरद पवारांमुळे हरवली अशी बोचरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र जो अठरापगड जाती, १२ बलुतेदारांचा आहे तो शरद पवारांनी स्वत:ची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून चालवला. पवार अँन्ड पवार कंपनी आता पवार अँन्ड सुळे कंपनी झालीय. जातीजातीत वाद लावायचे, जातीजातीत झुंजवत ठेवून प्रस्थापितांची घरे भरायची त्यामुळे याला कंटाळून महाराष्ट्रातील लोकांनी २०१४ ला परिवर्तन केले असं त्यांनी म्हटलं.

तसेच शरद पवारांचा महाराष्ट्रात जो शासनकाळ होता, तो महाराष्ट्राच्या इतिहासातील काळीकुट्ट पाने होती. पवारांनी फक्त भ्रष्टाचार केला, जातीयवाद केला आणि लोकांमध्ये भांडणे लावली. त्यामुळे आता शरद पवारांनी निश्चिंत राहावे, निवांत राहावे, हरिनामाचा जप करावा म्हणजे तुमच्या डोक्यात पुण्य काम करण्याची इच्छा जागृत होईल असा टोला गोपीचंद पडळकरांनी लगावला.

दरम्यान, २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस आणि आता एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला देशात परकीय गुंतवणुकीत नंबर एकला आणलं आहे. आज महाराष्ट्रातील युवकांना काम मिळतंय. वेगवेगळे उद्योग महाराष्ट्रात येतायेत. महिला सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात होतंय त्यामुळे महाराष्ट्राची ही प्रगती शरद पवारांना कुठेतरी खुपतेय. आज इतका आश्वासक चेहरा महाराष्ट्राला मिळाल्यानंतर शरद पवारांना हा चेहरा बदलून महाराष्ट्रात जातीयवाद निर्माण करायचाय का? महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? जातीजातीत भांडणे महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती बिघडवायची आहे का, दलित-ओबीसी नव्याने वाद निर्माण करण्याचा अध्याय घालायचा आहे का असा सवाल आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना विचारला आहे.

शरद पवार गटाचं पडळकरांना प्रत्युत्तर

काही लोक भाजपाचं बिस्किट खाऊन भुंकत असतात. त्यांना पुरोगामी काय आणि पुरोगामी विचार काय हे माहिती नाही. धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो बोलले होते मग अद्याप का दिलं नाही? आता तर तुम्ही आमदार झालात. भाजपाच्यावतीने किल्ला लढवतायेत. मग का तुम्ही फडणवीसांच्या बंगल्यावर मोर्चा काढत नाही, धनगर समाजाला आरक्षणाची मागणी करत नाही? शरद पवारांवर कॅन्सर झालाय, त्यावर इतक्या खालच्या पातळीवरील वक्तव्य फक्त पडळकर करू शकतात दुसरा कुठलाही नेता करू शकत नाही. धन्य ते भाजपा, ज्यांनी गोपीचंद पडळकरांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन उरावर घेतले आहे असा घणाघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गोपीचंद पडळकरांवर केला.