गुहागर मतदार संघातून संदीप फडकले अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता

खेड : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गुहागर मतदारसंघात बहुरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. खेड तालुक्यातील असगणी गावचे व कुणबी समाजाचे कार्यकर्ते संदीप फडकले हे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे.

कोकणातील अतिशय महत्त्वाचा असा विधानसभा मतदारसंघ म्हणजे खेड गुहागर विधानसभा मतदारसंघ. येथे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे प्रस्थ भक्कम बसलेले आहे. मात्र तरीही मागील विधानसभेच्या वेळी कुणबी समाजाचे सहदेव बेटकर यांनी भास्कर जाधव यांना कडवी झुंज दिली होती.

गेली २२ वर्षे दुबईमध्ये नोकरी केल्यानंतर २०१६ साली नोकरी सोडून गावी आले. आल्यावर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे धोरण बाळगून समाजकार्यास सुरुवात केली. सध्या ते एका पक्षाचे तालुकाप्रमुखही आहेत. त्याचबरोबर मतदार संघातील शेकडो गावांमध्ये कुणबी समाजाबरोबरच इतरही समाजातील लोकांबरोबर जनसंपर्क तयार करून आहेत.

लोटे येथे औद्योगिक वसाहत असल्यामुळे पंचक्रोशीतील स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या ओळखीचा फायदा करून घेतला आणि कित्येक तरुणांना नोकऱ्या मिळवून दिल्या. तालुक्यातील २५ गावात सुमारे आठ लाखाचे सोलर लाईट बसविण्यासाठी कारखान्यांच्या सीएसआर फंडातून निधी मिळवून दिला.

औद्योगिक वसाहतीच्या सीएसआर फंडाचा निधी तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आरसीसी तलाव बांधणे, आरसीसी टाक्या बांधणे, पाईपलाईन, करोना काळातील जनतेच्या गरजा, वैद्यकीय मदत, चिपळूण मधील पूरपरिस्थिती वेळी पूरग्रस्तांना सहाय्य या कारणांसाठी मिळवून दिला. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

तालुक्यासहित मतदारसंघातील सुमारे २२ जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी निधी मिळवून देणे, सुमारे ८० ते ९० संगणक संच शाळा महाविद्यालयांना पुरविण्यासाठी निधी मिळवून देणे तसेच दरवर्षी विद्यार्थ्यांना हजारो वह्यांचे वाटप यांच्या माध्यमातून करण्यात येते. दुबई वरून नोकरी सोडून गावी आल्यानंतर आपल्या गावातच असलेले पाच हजार वर्षांपूर्वीचे पांडवांनी बांधलेले शिवमंदिर, जे जीर्ण अवस्थेत होते, त्या मंदिराचा जीर्णोद्धार संदीप फडकले यांनी स्वखर्चाने केला आणि तालुक्यातूनच नव्हे तर जिल्हाभरातून हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. संदीप फडकले जर या विधानसभेला अपक्ष म्हणून आमदारकीला उभे राहिले तर प्रस्थापितांसमोर हे एक प्रकारे आव्हान असणार आहे. असे चर्चिले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:49 PM 04/Oct/2024