साडवली : शिमगा कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा सण आहे. अनेक चालीरीती, परंपरा यातून साजरा होणाऱ्या कोकणातील शिमगोत्सवाला नुकताच प्रारंभ झाला असून शहरी भागासह ग्रामीण भागात शिमगोत्सवाच्या फाका घुमू लागल्या आहेत, विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणाऱ्या या शिमगोत्सवात्साठी चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत.
देवा महाराजा उभा रहा, आज प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी शिमगा सुरू होत आहे. तुझ्या चतुर्थसीमेत येणाऱ्या जाणाऱ्या लेकराबालकांचा तू सांभाळ कर आणि प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी सुरू होत असलेला हा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात, आनंदात पार पडू दे, तुझ्या ज्या ज्या इच्छा असतील, त्या तू पूर्ण करुन घे, अशाप्रकारे प्रत्येक गावातील प्रथा परंपरेनुसार गावच्या देवाला जाप किंवा गा-हाणे मानकरी व गावकर यांच्यावतीने घालून शिमगोत्सवाला सुरुवात होते. फाक पंचमीला पहिली होळी सुरू झाल्यानंतर पालखी परत मंदिरात जाईपर्यंत कोकणातील गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असते, असा हा शिमगोत्सव कोकणातील प्रत्येक गावात वेगवेगळ्या प्रथे-परंपरेनुसार साजरा केला जातो.
या दिवसात गावोगावी ग्रामदेवतांच्या पालख्या निघतात. खेळे, संकासूर, सोंगे, भोवणीचे खेळे आदी प्रकार या काळात चालतात. सर्वत्र ढोल-ताशे यांचा आवाज दुमदुमत असतो. गावागावानुसार होळीमध्ये भिन्नता आढळते. इथल्या पालख्या आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण होळ्या ही कोकणातील संस्कृती आहे.
या शिमगोत्सवात गणेशोत्सवाप्रमाणे पंचपक्वानाचा थाट असतो. जेव्हा पालखी भक्तगणांच्या भेटीला घरोघरी जाते, तेव्हा या पंचपक्वानांचा नैवेद्य दाखविला जातो. पालखीबरोबर येणारे भक्तगण देखील या पंचपक्वानांचा आस्वाद घेतात, त्यानंतर सहाणेवर पालखी थांबते व नंतर रात्री विविध कार्यक्रम होतात.
डफावरची गीते, लावण्या, भजन, नमन, पालखी नृत्य, ढोलवादन आदी कार्यक्रम रंगू लागतात. सोंगे आणली जातात. सारे काही वेगळ्या बातावरणात घेऊन जाणारे है दिवस असतात. या उत्सवाच्या कालावधीत रखवालीचा विश्वास दिला जातो आणि रयतेला सुखी ठेवण्याचे आश्वासन दिले जाते. ग्रामदेवतेला गा-हाणे घातले जाते.
चाकरमानी गावी दाखल
कामानिमित्त बाहेरगावी गेलेले चाकरमानी या उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी खेड्याकडे धाव घेतात. ग्रामदेवतेच्या जयजयकाराने आणि डोल-ताशाच्या आवाजाने संपूर्ण परिसर अगदी दुमदुमला जातो. अशा या शिमगोत्सवाला आता प्रारंभ झाला असून, होळी, शिमगा आणि शिंपणे उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी चाकरमानी गावी दाखल झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 10/Mar/2025












