रत्नागिरी : आशादीप मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून, प्रतिवर्षाप्रमाणे आशादीप मतिमंद मुलांच्या रत्नागिरी येथील संस्थेमध्ये, महिला दिन उत्साहांत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती वंदना मांडगे खरमाळे, -उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ, रत्नागिरी या होत्या. या समारंभाला आशादीपचे संस्थापक ट्रस्टी व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र भूषण श्री. दिलीप रेडकर, अध्यक्ष अॅड. विनय आंबुलकर तसचं ट्रस्टी श्रीमती शामल शेठ, सौ. पूर्वा खालगांवकर या देखील व्यासपिठावर उपस्थित होत्या.

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिला सक्षमीकरण, त्यांचे हक्क, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, आणि राजकीय योगदान यांचा सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. सामाजिक क्षेत्रामध्ये, मतिमंद मुलांसाठी काम करत असतांना, रोजच्या ताणतणातून, स्वतःचा संसार सांभाळून, आशादीप मंतिमंद मुलांसाठी आपला वेळ देऊन, काम करणा-या आशादीपच्या सर्व महिलांचा, उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन आशादीप तर्फे सन्मान व गौरव करण्यात आला.

श्रीमती वंदना मांडगे खरमाळे, उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ, रत्नागिरी यांनी महिला दिनाकरीता सर्वांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. मंतिमंद मुलांसाठी आशादीप मध्ये ज्या महीला योगदान देतात, व देत आहेत, त्याची तुलना कोणत्याही बाबीशी होवू शकत नाही, मंतिमंद मुलांसाठी करावयाची कामे सर्वसाधारण असामी सहसा स्वीकारत नाहीत, तुम्ही करत असलेली सेवा, अशीच अविरत सुरु ठेवावी, अशी देखील विनंती त्यांनी आशादीप मधील सर्व महिलांना केली. आशादीपचे संस्थापक श्री. दिलीप रेडकर यांनी देखील, केवळ मानधनांवर काम करणा-या आशादीपच्या सर्व सेवेकरी महिलांचे या प्रसंगी कौतुक केले.

आशादीपचा पूर्व इतिहास, सध्याची व भविष्यातील, सर्व ट्रस्टींचे सहकार्याने सुरु असलेली वाटचाल याबाबतची माहीती या प्रसंगी सर्व उपस्थितांना आशादीपचे अध्यक्ष अॅड विनय आंबुलकर यांनी दिली. आशादीपमध्ये मतिमंद मुलांचे संगोपन व निवासी स्वयंरोजगार केंद्र या साठी जागा कमी पडत आहे, याकरीता आशादीपने नवीन नियोजीत बांधकाम सुरु करणेचा संकल्प केला आहे. समाजातील विविध स्तरांतील असामींनी या कामी सहाय्याची हमी दिली आहेच, तरी देखील सध्याचे परीस्थितीचा व सर्वचं क्षेत्रातील बांधकामाचे साहित्याचे दरामध्ये झालेली वाढ विचारांत घेता, निधीची कमतरता पडत आहे. सबब समाजातील सर्व स्तराने आशादीप या मतिमंद मुलांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या नियोजीत इमारतीकरीता हातभार लावावा, व देणगीरुपी निधी द्यावा, असे आवाहन देखील आशादीपचे अध्यक्ष अॅड. विनय आंबुलकर यांनी या प्रसंगी केले. आशादीप साठी दिला जाणारा निधी हा करमुक्त असलेचे देखील त्यांनी या कामी नमूद केले. या सर्व उपक्रमाचे व समारंभाचे उत्कृष्ठ नियोजन आशादीपच्या सौ. स्मिता जडे व सौ. रसिका बोरकर यांनी केलं होतं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 10-03-2025