चिपळूण : श्रीदेव जुना कालभैरवचा १३ पासून शिमगोत्सव

चिपळूण : चिपळूणचे शहराचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे शिमगा महोत्सव दि. १३ ते २१ मार्चपर्यंत साजरा होत आहे. या निमित्त पाच दिवस चिपळूणमध्ये जोरदार शिमगोत्सव साजरा होणार आहे. दि. १८ रोजी बाजार पालखी होणार आहे.

या शिमगोत्सावाच्या निमित्ताने दि. १३ रोजी रात्री ९ वा. ‘रंगला फड लावणीचा’ हा बहारदार लावणी कार्यक्रम होईल. रात्री १२:३० वा. होळी पूजन व होम प्रज्वलन होईल. यानंतर पुणेरी ढोल-ताशा पथक व मनोरंजनाचे कार्यक्रम होतील. दि. १३, १४ व १५ रोजी श्रींची सहाण भरणे, देवी भवानी भेट सीमा व धुळवट होईल. त्यानंतर श्री देवी विध्यवासिनी भेट सीमा व धुळवट, दि. १७ रोजी खिंड, उक्ताड, बाजार चव्हाटा सीमा होईल. रात्री ११ वा. वैश्य वसाहत येथे श्री देव केदार मंदिरातून ढोल-ताशांच्या गजरात विद्युत रोषणाईसह अंबारीतून मिरवणूक निघेल. दि. १८ रोजी श्री महालक्ष्मी भेट सीमा होईल. दि. १९ रोजी रंगपंचमी, रात्री चव्हाटा कार्यक्रम व कालभैरवाचे लळीत होईल. दि. २० रोजी पागझरी व पवार आळी सीमा. रात्री ११ वा. श्री केदारेश्वर मंदिर वैश्य वसाहत येथे लावण्यवती अप्सरा हा लावण्यांचा कार्यक्रम होईल. दि. २१ रोजी श्री केदार लळीत कार्यक्रम होईल.

ज्या भक्तांना पालखी नवसाच्या नारळांवर बसवायाची आहे त्यांनी विश्वस्त मंडळाला पूर्वसूचना द्यावी. पालखी रस्त्याच्या डाव्या बाजूने मार्गक्रमण करणार असून, उजव्या बाजूच्या भाविकांनी डाव्या बाजूला येऊन दोन्ही बाजूने पूजा करावी, असे आवाहन जुना कालभैरवचे विश्वस्त दिनेश देवळेकर, किशोर शेट्ये, समीर शेट्ये, पंकज कोळवणकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 10/Mar/2025