अनिता नारकर यांना ‘सुपर मॉम’ पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : आरती निराधार सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांत ४७ वृद्ध, दिव्यांग, निराधार व पीडित महिलांना आधार देणाऱ्या आणि आपल्या मुलीसह अनेक दिव्यांग व वृद्धांचे मातृत्व स्वीकारणाऱ्या सौ. अनिता आत्माराम नारकर यांना येथील आस्था सोशल फाउंडेशनचा “सुपर मॉम” पुरस्कार महिला दिनी प्रदान करण्यात आला.

सौ. सम्राज्ञी संजय चाळके यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

सौ. नारकर या गिरणी कामगाराच्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या. त्यांचे शिक्षण मुंबई येथे झाले. मुंबई महापालिकेत त्यांनी १९७८ ते २०१४ कालावधीत सेवा बजावली. त्यांना दोन अपत्ये आहेत. त्यातील ‘आरती’ ही बौद्धिक अक्षम प्रकारातील दिव्यांग असून, ती सध्या ४६ वर्षांची आहे. घरातील कामे ती उत्तमरीत्या आवडीने करते. तिने मॅरेथॉन खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. समाजसेवेची आवड व आपल्या मुलीचे अपंगत्व यामुळे सौ. नारकर यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर २०१८ साली चिपळूण तालुक्यातील पेढे येथे ‘आरती निराधार सेवा फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली व आता मालघर येथेदेखील संस्थेच्या या कामाची सुरवात झाली आहे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या पुरस्कार वितरणप्रसंगी “आस्था”च्या सुरेखा पाथरे यांनी सौ. अनिता नारकर यांची मुलाखत घेतली. यावेळी सौ. अनिता नारकर, आत्माराम नारकर, आरती नारकर, श्रीमती अनघा जैतपाळ, “आस्था”चे पालक, कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 10-03-2025