स्त्रियांच्या आत्मनिर्भरतीसाठी शाश्वत उपाययोजनांची गरज : स्वरूपा सामंत

पाली ( वार्ताहर ) : आजच्या युगात वावरताना स्त्रीकडे उपजत असणाऱ्या संयम व धाडस या दोन गुणांचा परिस्थितीनुरूप योग्य वापर करण्याचे कसब अंगीकारले जाणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांनी सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेत आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे स्त्रीला आर्थिक आत्मनिर्भर होण्यासाठी शाश्वत उपाययोजना व प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन संस्थेच्या संचालिका स्वरूपा सामंत यांनी केले.

पाली येथील डी.जे सामंत इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये माता पालकांसाठी जागर स्त्री-शक्तीचा अर्थात नारी तू घे भरारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याची थीम स्त्री पुरुष समानता असल्याने महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला. स्पर्धेचे उदघाटन श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका स्वरूपा सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डी.जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका नूतन कांबळे, पाली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन साळुंखे, पाककला परीक्षक गिरीश शितप, सांस्कृतिक कार्यक्रम परीक्षक साईराज चव्हाण,वैभव पवार, पाली केंद्राचे केंद्रप्रमुख विष्णू पवार, सामंत सीनियर कॉलेजच्या प्राचार्य डॉ.कांता कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रमुख वक्ते डॉ. सचिन साळुंखे यांनी ग्रामीण भागातील स्त्रीयांनी आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या योगदानाला सलाम करण्यात आला. तसेच, समाजात स्त्री-पुरुष समानता रुजवण्यासाठी प्रेरणा देण्यात आली.

महिला दिनानिमित्त माता पालकांसाठी पाककला, सोलो डान्स, ड्युअल डान्स आणि परफेक्ट मॅचिंग यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी,रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे परफेक्ट मॅचिंग स्पर्धेतील विजेत्याला पैठणी साडी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:22 10-03-2025