पुणे-सावंतवाडी विशेष रेल्वे गाडी सोडण्याची मागणी

रत्नागिरी : पुणे आणि कोकण यांना जोडणारी थेट विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी कोकण विकास समितीने केली आहे. पुणे ते सावंतवाडी दरम्यान कल्याण मार्गे विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवरील ताण कमी होऊन पुणे आणि कोकण दरम्यानची संपर्क व्यवस्था वाढेल, असे कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी निवेदनात रेल्वेच्या निदर्शनास आणून दिले आहे.

ही गाडी पुणे चिंचवड -लोणावळा कर्जत कल्याण पनवेल पेण-रोहा – माणगाव वीर तळेगाव -सापे वामने करंजाडी -खेड – चिपळूण -संगमेश्वर रोड सावर्डा- रत्नागिरी – राजापूर रोड – आरावली रोड -आडवली वैभववाडी रोड -विलावडे नांदगाव रोड -कणकवली – सिंधुदुर्ग – कुडाळ झारप सावंतवाडी रोड या स्थानकावर थांबवण्याची मागणी निवेदनात केली आहे.

या पूर्वी देखील गर्दीच्या हंगामात या मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या, ज्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा या मार्गावर विशेष गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे.

रेल्वे प्रशासन या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर विशेष रेल्वे गाडी सुरू करेल, अशी अपेक्षा कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:58 PM 10/Mar/2025