Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार? अर्थसंकल्पातून अखेर सरकारची भूमिका स्पष्ट

Ladki Bahin Yojana : मुंबई: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. यावेळी साऱ्यांच्या नजरा या फक्त आणि फक्त लाडक्या बहि‍णींना सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे २१०० रुपये मिळणार का याकडे होतं. मात्र, अजित पवारांना अर्थसंकल्पीय भाषणात त्याबाबतची काहीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी निराश झाल्या आहेत. तर यामुळे सभागृहात विरोधकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात काय?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २ कोटी ५३ लाख लाभार्थी महिलांना जुलै २०२४ पासून आर्थिक लाभ दिला जात आहे. त्यासाठी आतापर्यंत ३३ हजार २३२ कोटी रुपये खर्च झालेला आहे. २०२५-२६ मध्ये या योजनेसाठी ३६ हजार कोटी रुपये प्रस्तावित आहेत.या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला, अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे.

अजित पवार हे लाडकी बहीण योजनेबाबत बोलत असताना विरोधकांनी २१०० रुपयांबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा अजित पवार मध्येच थांबून म्हणाले की, जरा बजेट होऊ द्या ना… त्यानंतर त्यांनी आपलं बजेट वाचन सुरु ठेवले.

लाडक्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. मात्र, लवकरच लाडक्या बहिणींना दरमहा १५०० नाही तर २१०० रुपये देऊ असं आश्वासन सरकारने दिलं होतं. त्यामुळे या अर्थसंकल्पात त्याची घोषणा होणे अपेक्षित होतं. मात्र, तसं काहीही झालं नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी निराश झाल्या आहेत.

महिलांना एआयचे प्रशिक्षण देणार

तर, अजितदादांनी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी घोषणाही या अर्थसंकल्पात केली आहे. लाडक्या बहिणींसाठी टेक कंपनी मायक्रोसॉफ्टसोबत राज्य सरकार करार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या कंपनीच्या माध्यमातून हजारो महिलांना एआयचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. त्याशिवाय अझित पवारांनी विद्यार्थिनींसाठीही काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

लाडक्या बहिणींचा हप्ता १५०० रुपयेच राहणार?
राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३६ लाख कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. मात्र, मासिक हप्ता १५०० रुपये इतकाच राहणार असल्याचे अखेर स्पष्ट झालं आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी २१०० रुपये हप्ता करण्याविषयी कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही. अर्थसंकल्पापूर्वी, तसे संकेत भाजप नेत्यांनी दिले होते. भाजप नेते विधानपरिषद आमदार प्रविण दरेकर यांनी राज्याची आर्थिक घडी नीट करण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार आहे. पुढील २०-२५ वर्षांचं आर्थिक नियोजन या अर्थसंकल्पातून झालेलं दिसेल. लाडक्या बहिणींसारख्या हजारो कोटींच्या योजना गरिबांसाठी आहेत. त्यामुळं निश्चितचं अर्थव्यवस्थेवर ताण आहे, हे मान्य असल्याचं प्रविण दरेकर म्हणाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:23 10-03-2025