संगमेश्वर : शिमगोत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली असून कोकणात सर्वत्र शिमगोत्सवाचा सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात रंगणार आहे.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरात साजरा होणारा होल्टे होम हा एक असाच चकीत करणारा शिमगोत्सवातील प्रकार आहे. होम पेटवण्याच्या दरम्यान एकमेकांवर पेटती लाकडं फेकून मारली जातात. विशेष म्हणजे या प्रकारात कोणाला काही इजा होत नाही. कोकणात दोन प्रकारचे शिमगोत्सव साजरे होतात. त्रयोदशीच्या शिमग्यांना तेरसे, तर पौर्णिमेच्या शिमग्यांना भद्रेचे शिमगे
असे म्हटले जाते. संगमेश्वरनजीकच्या करंबेळे गावात संपन्न होणारा शिमगोत्सव म्हणजे शिवने आणि करंबेळे येथील दोन पालख्यांची गळाभेट असते. नजीकच्या वांद्री गावात पालख्यांची भेट नदीपात्राच्या मध्यभागी होते.
नोकरी-व्यवसायानिमित्त दूरवर असणारा कोकणातील माणूस शिमगोत्सावासाठी आवर्जून घरी येतो. ग्रामदेवतेपुढे नतमस्तक होणे, पालखी आपल्या घरामध्ये घेऊन देवीची ओटी भरणे आणि सालाबादच्या रखवालीचा नारळ अर्पण करणे हा एकमेव भक्तिमय उद्देश यामागे असतो. शिमगोत्सवात नमनखेळे, गोमू, संकासूर अशा विविध नृत्यप्रकारांचीही रेलचेल असते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 11/Mar/2025














