रत्नागिरी विमानतळाचे काम 147 कोटींच्या निधीतून युद्धपातळीवर सुरू

रत्नागिरी : रत्नागिरीमधील विमानतळासाठी तरतूद केलेल्या 147 कोटींच्या निधीतून हे काम प्रगतिपथावर आहे. जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी क्रुझ टर्मिनल उभारले जाणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे कामही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना भाषणात व्यक्त केला. केंद्राने पर्यटन वाढीवर भर दिलेला असतानाच यावेळच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारनेही सागरी पर्यटन वाढीवर लक्ष दिल्याचे दिसून येत आहे.

मागील वर्षी रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल कामासह अन्य कामांसाठी 147 कोटींचा निधी देण्यात आला होता. यातून रत्नागिरी विमानतळाच्या प्रवासी वाहतूक टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी आवश्यक असणार्‍या जागेचेही भूसंपादन झाले असून, प्रवासी टर्मिनलचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन वाढीच्या द़ृष्टीने विशेषत: सागरी पर्यटन वाढीला मोठा वाव असून, या ठिकाणी क्रुझ टर्मिनलही मंजूर झालेले आहे. याचे कामही लवकरच सुरु होणार आहे. सागरी पर्यटन वाढीसाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे कामही वेगाने व लवकरात लवकर पूर्ण केले जाणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली.

केंद्र शासनाने पर्यटन वाढीवर अधिक लक्ष केंद्रीत केले असल्याने, राज्य शासनानेही पर्यटनावर भर दिल्याचे दिसून आले. विशेषत: सागरी पर्यटन वाढीसाठी कोकण किनारपट्टीवर लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन वाढीला मोठा फायदा मिळणार आहे. रत्नागिरीसह गणपतीपुळे येथे धार्मिक पर्यटनाबरोबरच दापोली, गुहागरच्या सागरी पर्यटन वाढीला अधिक फायदा मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 11-03-2025