‘आरटीओ’ कडून शेतकऱ्यांचा वाहनांवर जाणूनबुजून कारवाई : सुधीर शिंदे

चिपळूण : वाहनांची कागदपत्रे असतानाही किरकोळ कारणे दाखवून शेतकऱ्यांच्या वाहनांवर आरटीओ (प्रादेशिक परिवहन) अधिकारी जाणूनबुजून कारवाई करीत असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी केला आहे. हा त्रास त्यांनी थांबवावा; अन्यथा त्यांच्याविरोधात शेतकऱ्यांसह आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबाबत पत्रकारांना माहिती देताना शिंदे म्हणाले की, शहरासह तालुक्याला लागणारा भाजीपाला मोठ्याप्रमाणात घाटमाथ्यावरून येथे येतो. स्थानिक शेतकरीही आपल्यापरीने काही भाज्यांचे उत्पादन घेऊन ते विक्रीसाठी येथे आणतात. भाजीपाला पिकवण्यापासून ते अगदी विक्रीसाठी बाजारपेठेत आणण्यापर्यंत शेतकऱ्यांना मोठे कष्ट घ्यावे लागतात. सध्याची बाजारपेठेची अवस्था व त्यातून मिळणारे पैसे याचा विचार करता अनेक शेतकऱ्यांनी नफा मिळावा म्हणून कर्जावर भाजीची वाहतूक करण्यासाठी वाहने घेतली आहेत. त्याचे हप्ते फेडताना त्यांच्या नाकीदम येत आहे. त्यामुळे शेतकरी संकटांत आहेत.

भाजीची वाहतूक करणारी वाहने आरटीओ अधिकारी जाणूनबुजून अडवतात. ती अडवताना समोर उभे न राहता आड मार्गाला लपून बसून वाहने अचानक थांबवतात. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटण्याचा धोकाही अधिक असतो. वाहने थांबवल्यानंतर कागदपत्रांची मागणी केली जाते. सर्व कागदपत्रे दाखवल्यानंतर वाहनात अधिक वजनाची भाजी आहे. याचबरोबर अन्य कारणे पुढे करीत १८ ते २० हजार रुपये इतका दंड आकारला जातो. कागदपत्रे नसताना कारवाई करण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र, नाहक कारवाई त्रासदायक ठरत असून आरटीओ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विचार करावा अशी त्यांना विनंती आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 11/Mar/2025