प्रखर उष्णतेमुळे आंबा करपतोय..

चिपळूण : प्रखर उष्णतेमुळे आंबा करपू लागला असून, यामुळे आलेल्या कैऱ्यादेखील काळ्या पडू लागल्या आणि कैऱ्या गळून पडण्याच्या प्रमाणातदेखील वाढ झाली आहे.

मागील पाच दिवसांमध्ये उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तो ३६ ते ३८ अंश सेल्सियस तापमानपर्यंत पोहोचला आहे. या उष्णतेच्या परिणाम आंबा बागायतीवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या प्रकारामुळे आंबा बागायतदार धास्तावला असून, आंबा बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून वर्तवली जात आहे. चिपळूण आणि खेडच्या खाडीपट्ट्यात उष्णतेच्या झळा वाढतच असल्याने याचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसू लागला आहे. वाढत्या उष्णतेने आंब्याच्या झाडांवरील कैऱ्या गळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. तसेच कैऱ्या उन्हाने करपू लागल्याने काळ्या पडू लागल्या आहेत. यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे आणि पडलेल्या थंडीमुळे आंबा पीक मुबलक प्रमाणात येण्याची आशा बागायतदारांना वाटत होती. यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे पालवी मोठ्या प्रमाणावर आली. डिसेंबरमध्ये थंडी पडू लागल्यावर मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली; मात्र ज्या प्रमाणात मोहोर आला त्या मानाने फळधारणा झालेली नाही. असे असतानाच यावर्षी आंबापिक उष्णतेचे शिकार बनले आहे. बागायतदार आंबापिक वाचवण्यासाठी धडपड करत आहेत; मात्र हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:44 PM 11/Mar/2025