रत्नागिरी : कोकणातील मोठा सण समजणारा व कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला शिमगोत्सवाला खर्या अर्थाने मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी गावोगावी तेरसे शिमगे रंगलेले पहायला मिळाले तर काही ठिकाणी भद्रेचे शिमगे 14 तारखेला होणार आहेत. ठिकठिकाणी पालखी भेट, होळी उभी करणे, फिरते खेळ पहायला मिळत असून, संपूर्ण कोकणातील वातावरण ढोल-ताशांच्या गजराने भारून गेले आहे.
गेल्या अनेक वर्षाची परंपरा, चालीरिती यातून साजरा होणार्या शिमगोत्सवाला गेल्या आठ दिवसापासून सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी फाका घुमू लागल्या आहेत. या शिमगोत्सवाला खर्या अर्थाने मंगळवारपासून रंग चढला आहे. तेरसे शिमग्याला सुरुवात झाली आहे. मंगळवारी अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावात वेगवेगळ्या प्रथेपरंपरेनुसार हा उत्सव साजरा केला जातो.
या कालावधीत गावोगावी ग्रामदेवतांच्या पालख्या घरभेटी निघतात. फिरते खेळे, संकासूर, गोमू आदी विविध प्रकार साजरे केले जातात. पालख्यांची भेट हा पण एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम असतो. होळी तोडली जाते. त्यामध्ये आंबा, शिवर यांचा समावेश असतो. ती तोडलेली होळी गावात आणून त्याची विधीवत पूजा केली जाते.
या शिमगोत्सवाला चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होतात. कोकणात गणपती उत्सवानंतर शिमगा उत्सव हा मोठा सण आहे. यासाठी बाहेरगावी गेलेल्या चाकरमानी या उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आपल्या खेड्याकडे धाव घेताना दिसतात. यामुळे ओस पडलेली खेडी यानिमित्त गजबजुन गेली आहेत. ग्रामदेवतेच्या जयजयकाराने आणि ढोलताश्यांच्या आवाजाने परिसर दुमदुमून जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 12-03-2025
